प्रवेश दहावा 1
प्रवेश दहावा
(कांहीं बालवीर प्रवेश करतात.)
नायक - आज मौज झाली कीं नाहीं ? बरेच दिवांनीं आज इतकें पोटभर खेळलों. तो पाठीवर हात मारण्याचा खेळ कसा गमतीचा आहे !
एक - आणि कोण जास्त वेळ हंसतो ! त्यांत कशी मजा ! आपल्या शिक्षकांना तर हंसतां हंसतां पुरे झालं. हर्षवायु होण्याची वेळ आली !
दुसरा - आतां पुन्हां केव्हां जावयाचें असेंच टेकडीवर ?
नायक - पंधरा दिवसांनीं पद्यावतीस जावयाचें आहे. तिथं सुंदर तळें आहे, पोहण्याची मौज येईल. जंगलांत सूरपारंब्या व इतर खेळ खेळण्याचीहि गंमत येईल.
तिसरा - ठरलें का ?
नायक - जर तुमचं सर्वाचं ठरलं, तेवढं सूत काढून झालं असेल तर ! त्या राघू वैगरेंनी तर केव्हांच सूत काढलं. ते लोक आपल्यापेक्षां अधिक कष्टाळू असतात, यांत संशय नाही.
एक - आम्हीहि लौकर काढूं !
नायक - चला आतां. (बालवीर जातात.) (रस्त्यांत पाहून) आं? हें कोण इथं पडलं आहे ? (खाली वांकतो.) याला ताप आला आहे. (नीट न्याहाळून पाहातो.) अरे, हा तर नारायण ! घेरी येऊन पडला आहे कीं काय ? का करावें ? अजून बालवीर दूर गेले नसतील (शिटी फुंकतो - पांच - सहा बालवीर दौडत येतात.) याला आपण आपल्या मंदिरांत नेऊं या. (काठीवर त्याला उचलून नेतात.)