प्रवेश पहिला 3
राघू - बाबा, घशास कोरड पडली हो, द्या पाणी द्या ! पोटभर पाणी तरी पाजा ! आग होत आहे सगळया अंगाची, बाबा ! (रडूं लागतो.)
पांडू - थांब, असा रडूं नकोस. देतें अं पाणी ! (माठांतील पाणी ओतून देऊं लागतो.)
नारायण - थांबा, थांबा, तें थंडगार पाणी देऊं नका. तापवलं होतं कां ?
पांडू - पाणी तापवायला लांकूड फांटा कुठून आणणार ?
नारायण - थांबा, मी आतां जाऊन सोडयाच्या दोन बाटल्या घेऊन येतों. (जातों )
पांडू - मुलाची बुध्दि पण थोर आहे. परंतु आमची सावलीहि घेत नाहींत, तिथं आमच्या घरीं येऊन असं याचं करणें याच्या घरीं कळलं, तर काय होईल कुणास माहीत ? माझ्यावरहि तोहमत येईल.
राघू - बाबा, द्या ना पाणी ? (नारायण येतो.)
नारायण - बाळ, देतों अं पाणी, (बाटलीं फोडतो ) ही घ्या बाटली; ओता या भांडयांत अन् द्या त्यास !
पांडू - बाळ, हें घे पाणी. आ कर, उघट तोंड नीट ! (पाजतो.)
राघू - बाबा हें पाणी असं काय ? अगदीं ? बेचव लागतंय् हो !
नारायण - बाळ, हें औषधी पाण आहे; हेंच पी ! डॉक्टर हेंच पाणी पिण्यास देतात बरं !
राघू - बाबा, पैसे होतें का तुमच्याजवळ हें पाण आणण्यासाठीं ? तुम्ही तर दोन दिवसांत कामावर गेला नाही !
नारायण - बाळ, तूं नको बोलण्याचे श्रम घेऊं. तुझ्या बाबांना मदत करावयास मी तयार आहे. काळजी नको करुं !
राघू - बाबा, हे कोण ?
नारायण - मी लक्ष्मीधरांचा मुलगा !
पांडू - काय लक्ष्मीधरांचे ?
नारायण - होय.