Get it on Google Play
Download on the App Store

प्रवेश पाचवा 2

माधव -  अहो, काळ खडतर येत चालला, आतां ठीक कसचं  या कलियुगांत ! धर्मावरची श्रध्दा उडत चाललेली लोकांची ! देवाचा कोंप होत चालला ! अतिदृष्टींने अति नुकसान झालं. शिकलेले लोक म्हणतात, मन चांगलं असलं म्हणजें झालं. करायचा काय धर्म ? '' खादीला मदत करा, शाळेला सहाय्य करा, महारमांगांना स्वच्छता शिकवा, '' हीं त्याचीं सूत्रं ! तिकडे देवावर कावळे बसताहेत ! (तपकीर ओढतो.)

लक्ष्मीधरपंत
-  पस्तावतींल पुढं वा पाखंडी वर्तनान ! कधीं सुख का होईल अशानं ? आचार: प्रथमो: धर्म: । ' आपला पूर्वापार आचार सोडून सगळा भ्रष्टाचार मांडला आहे, अलीकडच्या टारगटांनीं ! उघडतील म्हणावं डोळे !

खंडे -  सर्वत्र खेळखंडोबा माजला आहे धर्माचा !

गोपाळ - हजामत होतांच विलायतेहून आलेलं भस्म फुलानं लावतात, आणि एकाद्या ब्राह्मणानं भस्म लावलं तर हंसतात !

माधव - म्हणतात अस्पृश्यांना सुधारा, भेदाभेद वाईट ! मोठे आले आहेत धर्मावतार किनाई ! कुठं ते तप:सूर्य अनुयाशवल्क्य व कुठं ही घुंगुरटी !

राम -  खरोखरच हें पहावत नाहीं.

लक्ष्मीधरपंत -  कोणा धर्मनिष्ठाला हें पहावेल ? अलिकडची लहान लहान मूलंहि त्याच मार्गानं जाऊं लागलीं आहेत. शाळांत तर विटाळ-चांडाळ नाहींच. पोरं खुशाल वाटेल त्याच्या घ्ज्ञरीं जातात, खातात. अहो, तो त्या परशुरामपंताचा नातू, परवां एका महाराच्या घरीं जाऊन गप्पा मारीत बसला होता !

गोपाळ -  पंत, तुमच्या नारायणाबद्दलहि असंच ऐकतों. वेळींच बंदोबस्त करा. नाहींतर आग पेटल्यावर ती कशी विझवणार !

लक्ष्मीधरपंत -  कोण, माझा नारायण ? छे ! तो असं कधींच करावयाचा नाहीं. माझ्या मनाविरूध्द तो कांहींएक करणार नाहीं. मी त्यास स्वच्छ विचारूंन पाहीन.

राम -  हो; एकदां विचारून पहा. जर तसं कांही असेल तर वेळीच प्रायश्चित व गोप्रदान वगैरे करावं, काल देवळांत तशी कांहीं कुजबूज ऐकूं आली, कुणी म्हणत कीं, तुमचं घर वर्ज्य केलं पाहिजे !

खंडे -  तसं झालं तर फार वाईट ! तुम्हांला तर तें फारच असह्य होईल व आम्हांलाहि मरण !

लक्ष्मीधरपंर -  तुम्ही सांगितलं, चांगलं केलं.

खंडे -  अहो, स्नेह्याच्या हितास जागणं हें आमचं कर्तव्यच आहे.

सर्व -  बरं, येतो. (जातात.)