प्रवेश चवदावा 1
प्रवेश चवदावा
(संघमंदिराचा देखावा. खाटेवर नाराण आहे. समोर मेजावर लोकमान्य व महात्माजी यांच्या तसबिरी आहेत. त्यांना हार घातले आहेत. गादीवर गुलाबाचीं दोन फुलें आहेत. एकटा राघू तेथें आहे.)
राघू - नाना अजून तुम्ही शुध्दीवर येत नाहीं ! राघूला तुम्ही बरं केलंत, राघूच्या सेवेनं तुम्ही नाही का बरे होणार ? पण तुमचे हात, नाना, अक्षी पवित्र देवावाणी ! त्यानं मीं बरा झालों !पण माझे म्हाराच्या पोराचे हात नाना, ते पापी असतील का ? पण मी कधीं खोटं नाहीं बोललों, देवाला भिऊन वागत आलों. देवा, नानांना लवकर बरं कर. हा आईनं अंगारा पाठविला आहे, तो लावतों माझ्या नानांना, म्हणजे बरं वाटेल.
(बालवीर शिक्षक व लक्ष्मीधरपंत येतात.)
बा. शि. - राघू, तूं एकटाच इथं आणि दुसरं कुणी नाहीं ?
राघू - ते जेवायला गेले आहेत.
बा. शि. - राघू, नारायणाचं कसं आहे ? हें कसलं लावलं आहेस भस्म ?
राघू - माझ्या आईनं आंगारा पाठवला आहे, तो लावला.
लक्ष्मीधरपंत - आणि मी मात्र माझ्या बाळावर निखारे पाखडले ! राघू, हा शुध्दीवर नाहीं का रे येत ?
राघू - नाहीं ! वातांत नाना सारखें बोलतात. वातांत म्हणतात '' बाबा, मजवर असे रागवूं नका. मीं देवाला आवडेल असं केलं ! तुमचं ऐकलं नाहीं; क्षमा करा. '' असं बोलतात.
लक्ष्मीधरपंत - बाळ, तुमच्या पुण्याईनं माझीं पापं दग्ध होऊन गेली असतील ! मी कशाला रागावूं ? आतां नाहीं हो रागावणार !
नारायण - (वातांत ) आई - बाबा - नको ते पैसे, नको. गोरगरीब मरतात - पाणी, मला पाणी द्या ! का मी महारांना शिवतों म्हणून मला पण पाणी नाही ? द्या, पाण द्या. (पाणी देताता.)
लक्ष्मीधरपंत - बाळ घे. बघ माझ्याकडे ! ओळखलस का ?
राघू - पहा डोळे कसे फिरवतात.
नारायण - मी धर्मभ्रष्ट नाहीं - नाहीं. मी चांगला आहें हो बाबा ! हाय -राघू - आलों ss
लक्ष्मीधरपंत - बाळ बोलूं नको. शांत पड. घे पाणी, आ कर. मास्तर, याला घरी घेऊन हातों हो मी !
बा. शि. - अशा परिस्थितींत त्यास घरीं जाण्यास डॉक्टर परवानगी देणार नाहींत. इथंच जरा बरा होईपर्यंत त्याला असूं दे !