प्रवेश तेरावा 2
वासुदेवराव - चला ! पण ते पहा बालवीर - शिक्षकच इकडे येत आहेत. मीं म्हटलं नाहीं, कीं ते आल्याशिवाय राहणार नाहींत म्हणून ? (बालवीर - शिक्षक प्रवेश करतात.)
बा. शि. - नमस्कार, मी तुमच्याकडे मुद्याम आलों. आपण तर आपल्या मुलाचं मुखावलोकन करणार नाहीं, अशी प्रतिज्ञा केली आहे; तरीपण त्याच्या कठिण आजाराची वार्ता आपणांस देण हें माझं कर्तव्य मानून मी आपणांकडे आलों आहें. नारायण आमच्या संघमंदिरांत आहे. तिथं त्याच्या शुश्रूषेस दोन बालवीर व राघूहि आहे. ज्या महाराच्या मुलाची नारायणानं शुश्रूषा केली तोच राघू ! डॉक्टर येऊन तपासतात, औषध देतात; तसं घाबरण्यासारखं नाही ! आपणस आपल्या मुलाची हकीकत कळवण्यास आलों म्हणून आपण रागावणार नाहींच. आम्ही भ्रष्टाकार करणारे लोक आहोंत, हा आपला समज रूढीसमुन्द्रव आहे. त्यास सद्विचाराच्या कसोटीवर घांसल्यास खरा प्रकाश आपणांस कळून आपला आमच्यावरचा राग जाईल. आज बालवीरांबरोबर राघूच रात्रंदिवस तुमच्या मुलाची - मोठया भावाची करावी तशी शुश्रूषाकरीत आहे. शुश्रूषेचा आनंद चाखण्यांत त्यानें पहिलानंबर पटकावला आहे. राग मानूं नका. मी जातों.
लक्ष्मीधरपंत - नका, मास्तर, असं मला बोलूं नहा. हा लक्ष्मीधनपंत पूर्वीचा नव्हे बरं ! माझी कसाबकरणी मेली; पश्चातापाच्या आगीत मनावरची घाण जळून त्याचं सोनं झालं. चला ! माझा नारायण मला दाखवा ! अरे, मी त्यास घालविलें, भणंगभिका-याप्रमाणें भटकावयास लाविलं. बाळा, कामं करून पोट भरलं असशील ! अति श्रम होऊनच तूं आजारी झाला असशील ! आमच्या घरांत अन्न खायला माणसें नाहींत व तुला खायला अन्न मिळालं नसेल ! घरांत गाद्या पडल्या आहेत. तुला नीट धोंडाहि मिळाला नसेल ! मास्तर, माझ्या गुणी मुलावर काय ही स्थिती मीं आणली ! त्याची आई आज जिवंत असती तर असं होऊ देती का ? चला, मास्तर, मला नारायणाकडे घेऊन जा !
बा. शि. - फार उत्तम ! चला ! देव सारं बरं करील ! (जातात.)