प्रवेश अकरावा 1
प्रवेश अकरावा
(मंदिरांत अंथरूण करून त्यावर नारायणास ठेवतात.)
नायक - तें कपाटांतील थर्मामीटर आण पाहूं ! (ऐक जण आणून देतो, झाडून तें लावतो.) गार पाण्याची पट्टी आणून याच्या कपाळावर ठेवा. (घडयाळाकडे पाहतो व थर्मामीटर काढतो.) बराच ताप आहे, १०४ अंश आहे. अजून शुध्दिहि येत नाहीं.
(बालवीर - शिक्षक व डॉक्टर येतात. सर्व बालवीर वंदन करून उभे राहतात.)
बा. शि. - जरा दूर व्हा. आधीं गर्दी कमी करा. डॉक्टर, पहा.
डॉक्टर - श्रीमंतांचा मुलगा ! त्यावर शेवटीं अशी पाळी यावी ! मी औषध देतों पाठवून. रात्रीं त्याला इथेंच ठेवणार का ?
बा. शि. - वडिलांनीं तर याला घरांतून घालवून दिलं आहे. इथंच छान व्यवस्था करूं ! हवेशीर जागा आहे. दोन बालवीर नेहमीं पाळीपाळीनं राहतील. त्याला घरची आठवणहि होऊ देतां उपयोगी नाहीं. तथापि त्याच्या वडिलांकडेहि कळविलें पाहिजे. (राघू येतो.)
राघू - कुठं आहेत नाना ? (जवळ जाऊन) नाना, आतां तुमची सेवा मी करणार ! मास्तर, मी इथं राहूं ना ?
बा. शि. - रहा व दुसरा हाही राहील.
डॉक्टर - नीट जपा; कमी जास्त होतांच मला सांगा. हा मुलगा फार थोर मनाचा आहे. तो सदसद्विवस जागृत करण्याच्या बाबतींत माझाही गुरू आहे.
बा. शि. - होय. हा बालवीरांचा राजा आहे - आदर्शभूत बालवीर आहे.
डॉक्टर - चला.
बा. शि. - चला सरे. तुम्ही दोघे जण इथं रहा, चला. (नायक व राघू राहतात; बाकी जातात. पडदा.)