Get it on Google Play
Download on the App Store

प्रवेश आठवा 2

पांडबा -  मग आतां तुम्ही कुठं राहतां ?

नारायण -  पांडबा, माझ्या विशाल घरांत राहतों. माझं घर ___

पद (फटका)
विशाल उत्तंगही असे हें, । गृह माझें वसुधेवरती ।
अनंत नभ आच्छादन त्याचें । विविध भूषणें ज्यावरती ॥ ध्रु० ॥
गृहमाला, रवि, चंद्र, चांदण्या । शक्य कुणाला यद्रणती ।
हंडया, झुंबर, दीप तयाचे । निसर्गनिर्मित लखलखती ॥
स्थिरचर सारे पदार्थसंग्रह । ज्यामधिं भरले खेजूनी ।
कमी येथ नच कांहिं कुणाला । लोभ न धरितां दुष्ट मनीं ॥
दैवी संपत्तीनें व्हावें । कुणींहि येथें संपन्न ।
करणें सात्विक लोभ पुष्ट हा । तपोवृत्ति द्या त्या अन्न ॥
दु:खानें जग गांजुनि गेलें । कारण चळला हा मार्ग ।
नाहींतर केव्हांच जाहला । असता भूचा या स्वर्ग ! ॥


ईश्वराचं हें आकाशाचं पांघरूण कधीं कुणाला कमी पडणार आहे ? भूगातेची ही मांडी सदैव निजायला पसरलेली आहे. खालीं जमीन, वर विशाल आकाशाचा चांदबा ! पांडबा, आणखी काय पाहिजे ? दिवसभर कुठं तरी काम करतों, भुकेला कोंडा देऊन रात्रीं निजायला धोंडा घेतों ! भगवंत भक्ताला कधीं उणं पडूं देणार नाहीं. पांडबा, वडिलाचं कृपाछत्र नाहीसं झालं तरी देवाजीचं छत्र नाहींसं झालं नाहीं ना ? जाऊं द्या !  तुम्ही राघूच्या प्रकृतीस जपा. दुखणं उलटलं तर फार वाईट ! आतांच खाण्यापिण्याला जास्त जपलं पाहिजे. राघू, तूंहि फार श्रम नको करूं. पांडबा, घ्या हे पांच रूपये; मोसंबीं, डाळिंबं आणायला होतील.

पांडबा -  नको. मला आतां पैशाची जरूरी नाहीं. आतां पैशाची तुम्हांला खरी जरूरी आहे.

नारायण -  मला काय जरूर आहे ? कधीं जरूर लागलीच तर परमेश्वर कांहीं कमी करणार नाहीं. ठेवा, ठेवा ते पांच रूपये. पांडबा, मला परत देऊं नका, नको म्हणूं नका. पांडबा, तुम्ही नको म्हटलंत म्हणजे माझ्या जिवाला वाईट वाटतं ! बाबांच्या शब्दांपेक्षां तुमचा नकार मला जास्त दु:खदायक होतो.

राघू -  तुम्ही आमच्याकडेच रहानात ?

नारायण -  मी सर्वांशीं तुमचाच आहें. पांडबा, जातों मी. राघूला जपा !

पांडबा -  देव तुमचं कल्याण करो !