प्रवेश नववा 2
बा. शि. - हेच पुढं समाजाचे आधार होणार आहेत. तुम्हांस त्यांचा हिरवा फेटा व सुंदर पोषाख दिसतो, तशीं त्यांचीं मनंहि सुंदर होत आहेत; इकडे तुम्ही लक्ष देतां काय?
लक्ष्मीधरपंत - कोणत्या अनुभवावरून तुम्ही म्हणतां कीं, या चळवळीनं मनं सुंदर होतात ?
बा. शि. - ऐका अनुभव ! मुलें या चळवळींत आल्याबरोबर त्यांचीं मनें ताबडतोब फिरतात असें नहीं. बालवीर चळवळ म्हणजे कांहीं यक्षिणीची कांडी नाहीं कीं, जिच्यामुळं जन्मापासून जडलेल्या भिकार संवयी एकदम चुटकीसरशा नाहींशा होतील ! परंतु या चारपांच महिन्यांतही आम्हांस कांहीं मुलांत फरक स्पष्ट दिसून आला आहे. दोन परस्परांचें वैरी असणारे विद्यार्थी या चळवळींत येतांच मित्र झाले; कारण सर्व बालवीर हे आपणास भाऊभाऊ समजतात. तो विद्यार्थी पूर्वी सारखा आजारी पडे, तो आतां सणसणीत व गरगरीत झाला आहे. इकडची काडी तिकडे न करणारा तो वासुदेवरावांचा श्याम आतां आनंदानें स्वयंसेवक म्हणून पुढें येतो. हल्लीं तर स्वच्छता निर्माण करणं, औषधं देणं, शिकवणं हीहि कामं प्रौढ वीर करूं लागले आहेत; म्हणून म्हणतों की, हेच बालवीर पुढें खेडोपाडी जातील व स्वच्छता व आरोग्य यांचे धडे लोकांस देतील.
लक्ष्मीधरपंत - आणि माझ्या काटर्याप्रमाणं महारमांगांस शिवतील त्यांचे पाय चुरतील ! भ्रष्टाचार करण्यासाठी ही चळवळ आहे. तीमुळें महार, मुसलमान, सारे एक ठिकाणी यावयाचे, खावयाचे ! तुमचे ते प्रौढ वीरही हल्लीं महारांच्या पोरांना सूत काढण्यास शिकवितात. ज्या लक्ष्मीधरपंतानें पोटच्या पोरास हाकलून दिलें, तो संघटितपणें भ्रष्टाचार करणा-या तुमच्याही चळवळीस पै देईल, जागा देईल, असं मानतां कसं ? जा, निघा येथून !
बा. शि. - बरें आहे, लक्ष्मीधरपंत. मी पुन्हाहि आपणाकडे येईन. दुस-यांची समजूत घालणं, गैरसमज दूर करणं हें आमचं कर्तव्यच आहे. अपमान, नकार सर्व हंसतमुखानं सहन करणं हा आमचा धर्म आहे. असा एक दिवस येईल कीं तुम्ही आपण होऊन चळवळीला साहाय्य करण्यास पुढें याल ! ईश्वर तुम्हांस तशी बुध्दि देईल.
लक्ष्मीधरपंत - या. वेळ वाटेल तेवढा घ्या. पण पैसा घेऊं नका, म्हणजे झालें.
(जातात.)