प्रवेश तिसरा 2
डॉक्टर - अरे, जग म्हणजे असंच ! नारायणा, कुणी वरून हसतात तर कुणी मनांतच रडतात. कांहीं वरून गोड बोलतात, तर कांहीच्या पोटांत काळकूट भरलेले असतं. वागतात एका प्रकारें, पण मनांत विचर दुसरेंच ! आचार, विचार आणि उच्चार या तिहींमध्यें एकरूपता दाखवणारा सज्जन या जगांत खरोखर विरळा ! नारायणा, आमच्यासारखे उदरंभरू व समाजाच्या लहरीप्रमाणें वागणारें लाकच इथूनतिथून भरलेले !
नारायण - जगाचं हें असलं स्वरूप पाहून माझ्या ह्रदयाचं पाणी पाणी होतं हो ! सरभूत वस्तु दूर लोटून सालपटं उराशीं धरणं, मोती भिरकावून शिंपले पेटींत ठेवणं, मनुष्याच्या ह्रदयाचा खून करून रूढीची पूजा करणं, यांतच लोक गढून गेलेले ! डॉक्टरसाहेब, ख-या देशदैन्याकडे कुणीच बघत नाहींत. हो, पण आतां ही चर्चा राहूं दे ! आपण माझ्या बरोबर येतां ना ? एका गरिबाच्या पोराचें प्राण वांचवतां ना ? (डॉक्टरांची नकारदर्शक मुद्रा पाहून) डॉक्टर, ही विद्या शिकलांत तरी कशाला ? खरं देशदैन्य गरिबांच्या झोंपडयांत असतं ! लोकमताच्या तलवारीच्या धारेखाली राहून तुम्हीहि आपल्या शिक्षणानं सुधारलेल्या बुध्दीचा उपयोग देशदैन्याकडे डोळेझांक करण्याकडे करणार काय ? देशाचं दैन्य चारी बाजूंनीं वावटली-सारख धांवत आहे.
पद ( चाल-शाम चुनरिया )
देश अपुला दीन झाला । झोप त्याम बहु बाजुंनि जडाला । जरि नाहीं सावध झाला तरी बुडाला ॥ ध्रू० ॥ ओघ धनाचा अखंड गेला । जनता काढि तरि उपोषणाला । वसन नसे धड कुणाकुणाला ॥ १ ॥ गोधन आनन अनुदिनीं बघतां । अंत्यजांस झणिं पुनित न करतां । हाय कथूं किती कथा तुम्हांला ॥ २ ॥
म्हणून म्हणतों आपल्या सदसद्विवेक बुध्दीला चालना द्या !
डॉक्टर - नारायणा, चल ! येतों तुझ्याबरोबर, लोक काय म्हणतील तें म्हणोत ! सत्याची पूजा करणें हाच खरा धर्म हें मलाहि शिकलं पाहिजें चल.
नारायण - डॉक्टर असं होईल तरच सारा समाज सुधारेल. चला. (जातात.)