प्रवेश दुसरा 1
( एका गरीब शेतक-याचें अंगण. खाटेवर लक्ष्मीधराचा कारकून असून रामजी खाली केविलवाणा बसला आहे. )
कारकून - मग ह्या पैशांची फेड करणार तरी कधीं ? आज तीन वर्ष झालीं; व्याजाची पै दिली नाहींस. बोल, पैसे घ्यायला तुम्हांला कांहीं वाटत नाहीं, पण देतांना मात्र तुम्हांस वाटते जड ! घेतांना तुम्ही आमच्या दाराशीं नाहीं, पण देतांना मात्र तुम्हांस वाटतं जड ! घेतांना शंभर वेळां यावें ! बोल ना ? तीनदां वायदे केले आणि हात हालवीत आम्हांला माघारं दवडलें.
रामजी - रावसाहेब, असं रागावूं नका. तुम्हीच तारणार तुम्हीच मारणार ! आज तीन वर्ष सतत दुष्काळ पडत आहे. शेतांत मरेमरेतों राबतों, पण एक दाणा दृष्टीस पडेल तर शपथ ! घरांत पोरंबाळं आजारी ! माझी धाकटी सगुणा, मोटी गुणांची पोर ! रावसाहेब, दोन महिन्यांपूर्वी गेली हो ! (डोळयासांस पाण येतें.) घरांतील किडुकमिडुक तिच्या औषधपाण्यासाठीं विकलं. हल्लीं घरांत बायको पडलीच आहे अंथरूणावर ! म्हणून जरा सबुरीनं घ्या, तुमचे पैसे बुडणार नाहींत. दुस-याचं रीण ठेवून नरकांत का जायचं ? देवाशपथ पैशाची फेड करीन, पण -----
कारकून - त्या शपथा मला नकोत; पैसे केव्हां देणार तें सांग. धन्यानं सांगितलं कीं, पन्नास रूपये तरी घेऊन ये; नाहींतर फिर्याद करून, जप्ती आणून सर्व घरादाराचा लिलांव करतों. बोल, या घटकेस पन्नास रूपये मोजतोस कां दोन दिवसांत जप्ती आणूं?
रामजी - महाराज, असे कठोर नका होऊं ! वडिलोपार्जित लहानसं घर राहूं द्या पोरांना छायेसाठी ! तुम्ही मालकांची समजूत घाला, मध्यस्थी करा; मी स्वत: दोन दिवसांनी-तिला जरा बरं वाटलं म्हणजे धन्याकडे येईन, पदर पसरीन ! रावसाहेब, आम्हां गरिबांचे हाल-आमचीं आसवं तुम्हांला दिसत नाहींत का हो ?
कारकून - अरे, पैसे वसूल करून नेले नहींत, तर धनी आमच्यावरच गुरगुरतो. उद्यां काढून टाकलं तर माझ्या पोराबाळांचीहि उपासमार ! रामजी - तुझ्यासाठी करतों रदबदली. अरे, मी तुझ्यासाठीं नेहमीं सांगतों, म्हणून इतकीं वर्षे धनींसाहेबांनीं धीर धरला. नाहींतर लक्ष्मीधरपंतांनीं केव्हांच तुझ्या घरादारांवरून नागर फिरवला असता. (आवाज बदलून ) कायरे रामजी, ती पलीकडे काळी गाय चरत आहे; ती तुझीच वाटत? मोठी छानदार आहे गडया ! गाईची जतन छान केली आहेत.
रामजी - माझीच गाय, पोरांचा तिच्यावर फार जीव. सगुणा तर तिची पोळी सारखी खजवींत बसावयाची. गुणी पोर, सगुणेचा आवाल ऐकतांच गाय हंबरायची बघा !
कारकून - रामजी, ही गाय मला देशील विकत ? योग्य ती किंमत मी देईनच तुला ! तूं दोनचार रोजांनी येणार आहेसना तिकडे ? तुला पण पैसे कर्ज फेडण्यास होतील.
रामजी - रावसाहेब, घरांतील माणसांसारखी-प्राणांसारखी-ही गुरं आम्हालां दूर करवत नाहीत, ही गाय आमची तर कामधेनु,. सगुणेच्या आजारांत दूध लागलं तर वाटेल तेव्हां खालीं बसावं व चार धारा काढून घ्याव्या ! रावसाहेब, ही गाय म्हणजे घराची शोभा; ती नका मागूं.