यज्ञ 31
या भारतातही आज द्वेषाची उपनिषदे. द्वेषाची कुराणे पढविली जात आहेत. हिंदुस्थान केवळ हिंदूंचा असे कोणी म्हणत आहेत, तर या हिंदूस्थानाचे तुकडे पाहून पाकस्थाने निर्मू, असे कोणी म्हणत आहे. युरोपातील लोकांनी आपले लहान लहान गट केले. सारे स्वसंरक्षणास असमर्थ झाले. उद्या हिंदुस्थानातही जर अलग अलग राष्ट्रे जन्मली, तर सारी स्वसंरक्षणास असमर्थ ठरतील. सारा भारतवर्ष एक. जे जे या भरतखंडात आहेत, येथे ज्यांची घरेदारे, येथे जे राहू इच्छितात, धनी म्हणून नाही, तर एकमेकांचे भाऊ म्हणून नांदू इच्छितात, त्या सर्वांचा हा भारतवर्ष आहे. म्हणू या की, आपण सारे एक. असतील भिन्न धर्म, भिन्न भाषा, भिन्न प्रांत; परंतु भारतीयता एक आहे. या भारतात तरी आपण भेदात अभेद पाहू या, मिळते घेऊ या. महान ऐक्यसंगीत निर्मू या.
परंतु कोण ऐकणार ? द्वेषाचे फवारे उडत आहेत, गरळे ओकली जात आहेत, लहान लहान मुले जमवून त्यांच्या निर्मळ-निष्पाप मनांत विषे पेरली जात आहेत. अरेरे ! भारतमाता रडत असेल. दधीची भगवान काय म्हणतील ?
परंतु भारतमातेला एक सत्पुत्र या प्रचंड विरोधांच्या वावटळीत एका बाजूस साबरमतीच्या तीरी बसला होता. स्वतःचे जीवन शुद्ध करीत होता. मधूनमधून तो बाहेर येई, स्वतःच्या जीवनाची शेवटची पूर्णाहूती द्यावी म्हणून बाहेर येई; परंतु पुन्हा थांबे. आणखी होऊ दे निर्मळ जीवन, असे जणू त्या महात्मास वाटे.
हिंदू-मुसलमान भांडत आहेत, करू दे प्रायोपवेशन ! स्पृश्य बंधू अस्पृश्यांना माणुसकी देत नाहीत, करू दे प्रायोपवेशन ! परकीय सरकार भारतात दुही माजवू बघते का ? करू दे प्रायोपवेशन ! अशा रीतीने हा महात्मा जीवनाचा यज्ञ मांडीत आहे. त्याने होमकुंड पेटवले आहे.
आणि आज १९४० साली फारच भीषण छाया जगावर पसरली आहे. युद्धाचा डोंब पेटला आहे. कोणी जगाला गुलाम करण्यासाठी लढत आहेत. कोणी जगाला स्वातंत्र्य देण्यासाठी म्हणून लढत आहेत; परंतु स्वातंत्र्यासाठी लढणारेही आपल्या पंजाखाली कोट्यवधी लोक दाबून ठेवू पाहत आहेत. सारा दंभाचा, स्वार्थाचा, अहंकाराचा पसारा ! आणि या भारतवर्षातही पूर्वी कधी नव्हता इतका परस्परअविश्वास, इतका परस्परद्वेष आज पसरला आहे. द्वेष पसरविण्यातच कृतार्थता मानली जात आहे.
अशा वेळी साबसमतीच्या तीरावर जेथे दधीचींनी प्राचीन काळी जीवनार्पण केले, त्याच स्थानी बसून ज्याने आपले विशुद्ध जीवन अधिक विशुद्ध केले, असा आजचा हा महर्षी, आजचा हा महात्मा, आजच्या या भीषण काळी जीवनाची शेवटची पूर्णाहुती देण्यासाठी उभा राहत आहे. अंधारात प्रकाश यावा म्हणून जगाला खरी शांती, खरी स्वतंत्रता, खरे सुख-समाधान लाभावे म्हणून शेवटचा यज्ञ करण्यासाठी अधीर होत आहे. ह्या आजच्या नव दधीचीकडे पाहा. त्या यज्ञमूर्तीकडे बघा व आपापल्या जीवनात यज्ञपूजा सुरू करा, लहानमोठी यज्ञज्योत पेटवा. कारण यज्ञहीन राष्ट्र मरते व यज्ञपूजक राष्ट्र जगते. ‘त्यागेन एव एकेन अमृतत्वमानुशः’ हे श्रुतिवचन आहे.