यज्ञ 23
दधीचींचा देह पाहून पाखरे वेडी होत, हरणे वेडी होत. दधीचींच्या श्वासोच्छवासातून दिव्य सुगंध बाहेर पडे. त्यांचे ते डोळे आणि त्यांतील ती बुबुळ- शक्तिपुटातून काळ्या रंगाचे निर्मळ मोतीच बाहेर पडत आहेत असे वाटे. अर्धोन्मीलीत असे ते डोळे असत आणि दात म्हणजे जणू हि-यांची पंक्ती, मोत्यांची आवली ! दधीचींच्या अंगावर आनंदाचे रोमांच उठत व अष्टभाव दाटून स्वेदकणिका उठत, त्या वेळेस अनंत ताराच अंगावर आहेत असे वाटे.
दधीची कधीकधी अत्यंत एकाग्र होत. त्या वेळेस पक्षी त्यांना प्रदक्षिणा घालीत, हरणे चरणांशी बसत. जणू स्थिरतेचे धडे त्यांना मिळत असत. समाधी सुटावी व दधींजींच्या डोळ्यांतून प्रेमाश्रूंचे शत पाझर सुटावेत. मांडीवर पक्ष्यांनी बसून चंचुपुटे हळूच वर करून ते घळघळणारे अश्रू गिळावेत. असा आनंद, परमानंद त्या वनात भरला. दधीची स्थिरचराशी एकरुप झाले. प्रेमाने सर्व ब्रह्माण्डाशी मिळून गेले.
त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या आनंदाचा, त्यांच्या समवृत्तीचा परिणाम आसपासच्या चराचर सृष्टीवर होऊ लागला. त्या तपोवनातील पक्षी भांडत नसत. साप मुंगुसाजवळ खेळे व मोरासमोर प्रेमाने डोले. नागाचा फणा पाहून मोरही प्रेमाने पिसारा उभारी. एकदा सौराष्ट्रातील एक सिंह-मिथुन चुकून या साबरमतीच्या तपोवनात आले. त्या वनात येताच त्यांचे जीवन बदलले. शरीरातील अणुरेणू बदलत आहे असे त्या सिंह-जोडप्याला वाटले. समोरून हरणे आली. मृगेंद्रासमोर मृग नाचत आले. सिंहाने त्यांना चाटले. हरणांनी शिंगांनी त्याची आय़ाळ विंचरली. सिंहिणीला नाचावेसे वाटले, सिंह व सिंहीण हरणांबरोबर आश्रमाकडे गेली. दधीची एका तरुतळी बसले होते. सिंह व सिंहीण प्रदक्षिणा घालती झाली. हरणांबरोबर नांदू लागली.
त्या तपोवनातील तरू, लता, वेली सदैव टवटवीत दिसत. जणू दधीचीच्या प्रेमातून त्यांना ओलावा मिळे, ऊब मिळे. झाडावरची फुले अधिक सतेज व सुगंधी झाली. फळे अधिक सुंदर व रसाळ झाली. साबरमतीचे पाणी अधिकच स्वच्छ व मधुर असे झाले. पाखरांच्या पंखांचा रंग अधिकच खुलू लागला. सर्वांना जणू अमृताचा स्पर्श झाला. अमर रसायन मिळाले.
एखाद्या दिवशी समाधी सोडून प्रेमभराने दधीची नाचू लागत. जणू ते प्रेम जगाला देत, दोन्ही हातांनी वाटीत. ते नाचू लागले म्हणजे मोर नाचू लागत. सारी पाखरे नाचू लागत. हरणे नाचू लागत, साप डोलू लागत. तरू, लता, वेली नाचू लागत, साबरमतीचे पाणी नाचे, तेथील कंकर नाचत, वाळवंटातील कण थै थै नाचत. पृथ्वीला नाचावेसे वाटे. आसपासच्या टेकड्या नाचात सामील होत. सकल चराचराचा जणू विराट प्रेममय नाच सुरू होई आणि वारा प्रेमाचे सामगीत म्हणे.
असा हा तपःसूर्य तेथे तापत होता. प्रेमचंद तेथे शोभत होता. त्याच्या प्रेमाची ऊब जगाला मिळत होती. म्हणून जगाला धुगधुगी होती. परंतु दधीचींना त्याची जाणीव नव्हती. त्यांचा अहं मेला होता. त्या शरीरात आता दधीची नव्हते राहत. त्या शरीरात विश्वमूर्ती येऊन राहिली होती. विश्वंभर वास्तव्य करीत होता.