यज्ञ 6
परंतु वृत्राला आंतरिक सौंदर्य बघावयाचे होते. या सुजला, सुफला, सस्यश्यामला, मलयजशीतल भरतभूमीच्या लेकरांचे अंतःकरण त्याला पाहावयाचे होते. त्याला ब्रह्मर्षीं, राजर्षी दिसू लागले. त्याला जपीतपी दिसू लागले. परंतु वृत्र आणखी आत जाऊ लागला. त्याला पुष्कळशी नकली नाणी दिसून आली. बाहेर संयम, परंतु हृदयात वासनांचा नाच. बाहेर दिसायला साळसूद, पोटात कामक्रोधांचे गराळे. कोणाचे जप राज्यासाठी, कोणाचे यज्ञ पुत्रासाठी, कोणाची तपश्चर्या आयुष्य वाढावे म्हणून, कोणाची तपश्चर्य़ा त्रिभुवनाचे भस्म करता यावे म्हणून. त्या जपतपाच्या मुळाशी नाना प्रकारच्या वासना होत्या.
आणि काही काही ठिकाणी तर त्याने विचित्र प्रकार पाहिले. वर्षानुवर्षे चाललेले यज्ञ त्याच्या दृष्टीस पडले. त्या यज्ञातून सहस्त्रावधी पशूंचे हसत हसत हवन केले जाई. मांस खावयास मिळावे म्हणून यज्ञ ! जिभेचे चोचले पुरविण्यासाठी यज्ञ ! धर्माच्या नावाने अधर्म चालला होता. सारा जणू स्वैराचार चालला होता. मांस खावे, सोम प्यावा, खाणेपिणे यापलीकडे काही आहे, याची स्मृतीच नाहीशी झाली. पशूंना खाऊन मानव पशू होऊ लागला.
परंतु यज्ञाच्या या विकृत स्वरूपाविरुद्ध बंड उभारणारे लोकही वृत्ताला दिसले. मांसाशनासाठी वृक्व्याघ्रांप्रमाणे ओठ चाटणारे व मिटक्या मारणारे लोक एकीकडे होते, परंतु दुसरीकडे-
“आत्मा यजमानः श्रद्धा पत्नी, मन्युः पशुः तपो अग्नि।”
अशा प्रकारचा दिव्य यज्ञधर्म समाजाला देऊ पाहणारे महर्षींही उभे होते.
परंतु एकंदरीत पृथ्वीची स्थिती भयाण होती. खरा त्याग, खरा धर्म कोठेच जवळजवळ नव्हता. भरतखंडीतही तो फारच थो़डा आढळला. वृत्र तपोवनातून गेला. तेथे त्याला पुष्कळच काथ्याकूट आढळला. वृत्र तपोवनातून गेला. शब्दांचा कीस काढणारे शब्दच्छल करणारे. पृथ्वीत राम उरला नव्हता. सृष्टीची, चराचराची ना़डी वृत्राने पाहिली. माझ्या परीक्षेत हे विश्व टिकणार नाही, असे त्याला वाटले रोगी मरणार, असे त्याला वाटले.
परंतु ईश्वराने नेमलेले कार्य कठोर असले, तरी वृत्राला करणे भाग होते. सूर्याला धेनूसहवर्तमान गिळून टाकण्याचे त्याने निश्चित केले. सूर्याला सहस्त्रावधी गाईंसह एकदम गिळण्याची त्याची शक्ती होती. परंतु खेळत खेळत, हळूहळू सर्वांना गिळावे, असे त्याने योजिले.