यज्ञ 13
“हे काय काहीतरीच ! असे करू नये. आपण नीट बोलू या. कोणता आहे शत्रू, कोणते आहे संकट ? सांगा सारे.”
“शत्रूचा अद्याप पत्ताच नाही. त्याने सूर्य व त्याच्या तेजःप्रसवा गाई, सर्वांना गिळले असे म्हणतात. शत्रू कोठे राहतो, त्याचे किल्लेकोट कोठे आहेत, गडगाढ्या कोठे आहेत, सारे शोधावे लागेल. वा-याला पाठवणार आहे संशोधनासाठी. पण वारा तरी तयार होईल की नाही कळत नाही. सारे भिऊन गेले आहेत.”
“वायुदेव जातील. कोठून तरी ते घुसतील, वार्ता आणतील.”
“अग, ज्याने सू्र्याला तोंड न भाजता गिळले, हात न भाजता धरले, तो वा-याचीही मोट कशावरून बांधणार नाही ? सारे चमत्कारिक झाले आहे. मीही उद्या बाहेर पडणार आहे. शत्रूचा नाश करीन तेव्हाच तुला तोंड दाखवीन. विजयी इंद्राला मग पुष्पहार घाल.”
“मला चिंता वाटते. कसे होईल तुमचे ?”
“आम्हा देवांना मरण नाही.”
“परंतु क्लेश तर आहेतच. मरण पत्करले, परंतु हे अमृतत्त्व नको. मी येऊ तुमच्याबरोबर?”
“नको. मी अपयशी झालो तर तू ऊठ. स्त्रियांची शक्ती सर्वांच्या शेवटी. कारण तुम्ही यज्ञमूर्ती आहात. पुरुषांपेक्षा तुम्ही यज्ञधर्माची अधिक उपासना करता. मला निरोप दे. कर्तव्य कठोर असते, तुझा बाहुपाश दूर कर.”
“मी तुम्हाला मोह घालणार नाही. माझा बाहुपाश दूर करते. माझा हात तुमच्या खांद्यावर आहे. तो तुम्हाला धीर देण्यासाठी आहे. जा. स्वधर्म आचरा, स्वकर्म करा. विजयी होऊन या. मग मी तुम्हाला पंचारती ओवाळीन. नाथ, आपण दोघे अतःपर स्वधर्माचा सांभाळ करू, एकमेकांस सत्पथावर ठेवू. जा. तुम्हाला यश येवो अशी मी प्रार्थना करीन. दुसरे काय करणार ?”
“प्रार्थना कर. प्रार्थना ही मोठी शक्ती आहे. प्रार्थनेने पर्वत विरघळतात. समुद्र मार्ग देतात. पवित्र प्रार्थना. तिने काट्यांची फुले होतात, पाषाणाची पारिजाते होतात. प्रार्थना. तिने भयंकर भुजंगांचे सुकुमार हार होतात. व्याघ्रवृक हरणांप्रमाणे जवळ येतात. प्रार्थना म्हणजे अंधारातच प्रकाश, मरणोन्मुख जीवन. शचीदेवी, प्रार्थना कर. विश्वाचे मंगल व्हावे म्हणून निर्मळ, निःस्वार्थ प्रार्थना कर.”