Get it on Google Play
Download on the App Store

यज्ञ 19

प्रवचन संपले. छात्र निघून गेले. ते झोपले. परंतु दधीचीला झोप येईना. तो बळाचा उपासक होता. ख-या सामर्थ्याचा उपासक होता. तो आश्रमातील अंगणात फे-या घालीत होता. तो विचारात मग्न झाला. हळूच दधीचीच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने वळून पाहिले, तो कोण?

“गुरुदेव !” तो सकंपवाणीने म्हणाला.

“काय बाळ ?”

“मी उत्तरोत्तर उच्च बळाकडे कसा बरे जाईन ? खरे बळ मला मिळू दे. तुमचा आशीर्वाद द्या.”

“मिळेल तुला ते परमश्रेष्ठ बळ. माझा आशीर्वाद आहे. जा आता व शांतपणे झोप. तू महापुरुष होशील.”

प्रमाण करून दधीची गेला व विचार करीत करीत झोपी गेला.

दधीचीचे आता खाण्यापिण्यात लक्ष नसे. तो ना फळ खाई, ना दूध पिई. तो पाण्यात आता डुंबत नसे, पहाड चढत नसे. तो विचारातच मग्न असे. आश्रमातील मुले त्याची थट्टा करीत.

“दधीची, असे, ती फळांची टोपली फस्त करून टाक ना ! ती फळे केव्हाची तुझी वाट पाहत आहेत.”

“आपला उदार आश्रयदाता आज कोठे गेला, असे मनात येऊन ती फळे रडत आहेत.”

“तुझ्या पोटाच्या पेटा-यात जाऊ देत बाबा ती !”

“खात जा बाबा, नाही तर हे दोर्दंड दोरीसारखे होतील.”

“हे हत्तीसारखे पाय करकोचाच्या पायासारखे होतील.”

“आपली त्याच्यावर दृष्टी पडली बहुधा !”

“म्हणून का स्वारीला खाण्याचा वीट आला ?”