यज्ञ 4
वृत्राच्या दृष्टीत एक गोष्ट विशेषकरून भरली. प्रत्यही प्रभातवेळी पूर्व दिशेला तो एक सुंदर चमत्कार बघे. ते दृश्य मोठे नयनमनोहर असे. किती पाहिले तरी वृत्राला समाधान नसे. त्या पूर्व दिशेला सूर्य़ नावाचा एक तेजस्वी गोपाल उभा राही. चराचराचा जणू तो मित्र होता. त्या गोपालाजवळ सहस्त्रावधी गाई होत्या. नाना रंगांच्या गाई. सात रंगांच्या त्या गाई होत्या. त्या गाईंच्या कासेतून प्रकाशाच्या धारा बाहेर पडत. दुधासारख्या धारा. त्या धारांचा पृथ्वीवर वर्षाव होई. तो सूर्य़ सारखे त्या गाईंचे दोहन करी. आरंभ आस्ते आस्ते होई. परंतु दुपारची वेळ होत आली म्हणजे हे काम रंगात येई. भराभरा धारा सुटत. सूर्य सायंकाळी दमे व थके. गाईंच्या कासाही रिकाम्या होत. मग त्या गाईंना नंदनवनातील कुरणात सूर्य घेऊन जाई. तेथील मधूर व तेजोमय चारा त्या खात, तेथील अमृत पोटभर पीत. पुन्हा प्रभात होताच सूर्य त्या सहस्त्रावधी धेनूंचे दोहन करू लागे. चराचराला धारोष्ण दूध मिळे. प्रकाशमय, जीवनदायी अशा दुधाचा तो वर्षाव करी.
त्या गाईंच्या कासेतील धारा नाचत नाचत झरकन पृथ्वीवर येत. त्या धारा म्हणजे जणू त्या गाईंच्या जिभा होत्या. त्या प्रकाशमय जिभा चराचराचे अंग चाटीत. चराचराला तेज चढे. कळा चढे. झाडे टवटवीत दिसू लागत. फुले फुलत. धान्य वाढत, फळांना रंग येई. पाखरे नाचू लागत. माणसांना उत्साह मिळे. त्या प्रकाशमय धारा खिडकीतून, झरोक्यातून घरात शिरत, सर्वांना आनंदवीत व हसवीत. त्या धारा म्हणजे जणू आरोग्याचे रसायन, जीवनाचे पुष्टीप्रदान. त्या धारा म्हणजे जणू प्रभूचा मंगल आशीर्वाद !
अशा प्रकारचे काम तो तेजोमय सूर्य प्रत्यही करीत असे त्याला कधी कंटाळा माहीत नव्हता. त्या स्वकर्मात तो सूर्य रमे. सारे चराचर त्याचे आभार मानीत. सूर्य दिसताच फुले वर माना करून त्याचे स्वागत करीत. आपल्या सुगंधाची आरती त्याला ओवाळीत. तळ्यातून झोपलेली कमळे हळूच डोळे उघडून प्रेमभक्तीने सूर्याकडे बघत. झाडे आपली हिरवी अंगे प्रेमाने नाचवीत. गिरीशिखरे त्या सूर्यनारायणाला आपल्या ड़ोक्यावर घेऊन नाचवू बघत, पाखरे त्याची गाणी गात. घारी, गरुड, चंडोल यांना तर सूर्याला मिठी मारावी असे वाटे. उंच उडत ती जात. चंडोल तर फारच उंच जाई. परंतु प्रणाम करून पुन्हा खाली येई.
मनुष्यप्राणीही सूर्याचे उपकार जाणी. ‘सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च’ सूर्य हा चराचराचा आत्मा आहे, अशा अर्थाची स्तुतिपर गीते मानव रचू लागला. कोणी म्हणत, ‘हा ईश्वराचा डोळा आहे.’ कोणी म्हणत, ‘हा ईश्वाराचा मुकुट आहे.’ कोणी म्हणत, ‘ईश्वराच्या भव्य मंदिरातील ही दीप आहे.’ कोणी म्हणत, ‘ईश्वराच्या कानातील कुंडल आहे.’ कोणी म्हणत, ‘त्याच्या वक्षःस्थलावर रुळणा-या हारातील हे दिव्य पदक आहे.’ अशा प्रकारे प्रतिभावान कवी कल्पनाविलास करीत होते. त्या सूर्य़ाचे वर्णन करून, स्वतःची वाणी पावन करून घेत होते.