यज्ञ 24
अशा या दधीचीकडे देवांसह इंद्र यावयास निघाला. सारे देव पायी येत होते. महात्म्याच्या दर्शनासाठी अनवाणी बद्धञ्जली असे ते येत होते. देवांच्या संगे मानवांचेही काही प्रतिनिधी होते. आपल्या तपःसामर्थ्याने जे अद्याप जिवंत होते, असे अत्री व वामदेव, वसिष्ठ व विश्वामित्र, अगस्ती व गौतम हेही निघाले.
दधीचींच्या तपोवनात मंडळी शिरली. सर्वत्र पावन व मंगल असे वाटले. सर्वत्र सुगंध दरवळत होता. येणा-या थोरांचे पाखरांनी स्वागत केले. वृक्षांनी पुष्पांचे अर्घ्य दिले. देव व मानव आदराने व भक्तीने ओथंबून हळूहळू येत होते. ध्यानस्थ बसलेल्या दधीचींस सर्वांनी प्रदक्षिणा घातली. सारे हात जोडून उभे राहिले. नंतर सर्वांनी स्तव आरंभिला. दधीचींनी हळूहळू नेत्र उघडले.
देवेंन्द्र बोलू लागला, “हे महर्षे, हे यज्ञमृत, हे प्रेममया, ज्ञानमया, सर्व सृष्टीचा संहार होण्याची पाळी आली आहे. काही उपाय चालत नाही. आम्ही सारे कर्मच्युत झालो. भोगी व विलासी झालो. यामुळे सारी शक्ती गेली. आम्ही आज हतबल आहोत. घोर, प्रबळ शत्रू उत्पन्न झाला आहे. त्याने धेनूसंह सूर्य़ाला पळविले आहे. सर्वत्र हाहाकार झाला. सूर्य लोपला. अशा प्रसंगी आपणच तारू शकाल. आपल्या तपात सर्वांचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य आहे. समाधी सोडा. दयेने आम्हांकडे पाहा. आपल्या चरणांना आम्ही शरण आहोत.”
इंद्र थांबला. देवर्षी व महर्षी गीते गीऊ लागले. पुण्यमंत्र म्हणू लागले. दधीचींनी प्रेमाने सर्वांकडे पाहिले. घळघळ गंगा नेत्रांतून वाहिली. ती सुललित तनू पुलकित झाली. अष्टभाव दाटले. दधीची विनयाने उभे राहिले. ती पुण्यमूर्ती उभी राहिली. त्रिभुवनाचे मंगल उभे राहिले. कल्याण उभे राहिले. भाग्य उभे राहिले. दधीची बोलू लागले. वृक्षांवर पाखरे मुकी होती. पशूही झाडांखाली कान लावून ऐकत होते. साबरमतीचे पाणीही जणू वाहावयाचे थांबून ऐकू लागले. वृक्षांनी सहस्त्रावधी पर्णांचे कान केले व दधीचींचे शब्द ते प्राशू लागले.
दधीची म्हणाले, “देवश्रष्ठा सुरेंद्रा, हे सर्व देवांनो, हे थोर ऋषिमुनींनो, आपण आज मला कृतार्थ केलेत. आपले दर्शन देऊन मला पावन केलेत. तुमच्या पुण्यमूर्ती पाहून मी धन्य झालो. मी आपला सेवक आहे, नम्र सेवक आहे. योग्य सेवा करता यावी म्हणूनच माझे जीवन मी निर्मळ करीत होतो. हे माझे जीवन घ्या व उपयोगी लावा. तुम्ही ज्या अर्थी माझ्या जीवनापासून सेवा घेणे इच्छित आहात, त्या अर्थी माझे जीवन निष्पाप झाले असावे असे मला वाटते. घ्या हे जीवन. या जीवनाचा मी स्वामी नाही. माझ्या जीवनाचा घडा शुद्धतेने भरलेला असेल तर तो घ्या व तुमच्या सेवेत रिता करा. देवेंद्रा, काय करू मी? कोणती सेवा ?”
असे बोलून दधीचींनी सर्वांस सप्रेम लोटांगण घातले. इंद्रवरुणांनी, वसिष्ठवामदेवांनी दधीचीस उठविले. सर्वांची हृदये भरून आली होती. थोरांचे थोर शब्द. ते दगडांना पाझर फोडतात, त्यांना नवनीताप्रमाणे मऊ करतात.