Get it on Google Play
Download on the App Store

यज्ञ 15

“आपण देवही जेथे व्रतच्युत झालो, तेथे मानवांची काय कथा ? देव विलासी व विषयलंपट झाले, मग मानव काय निराळ्या मार्गाने गेले असतील ? मानव आपणाहूनही क्षीणशक्ती झाले असतील. अंतर्बाह्य पोखरले गेले असतील. ते काय आधार देणार, कोणते साहाय्य करणार ?” असे काही देव म्हणाले.

“परंतु मानवात कोणी आहे का महात्मा, ते पाहायला काय हरकत ? खोटा अहंकार नको. धर्माचे सिंहासन कोठे असेल, त्याचा नेम नसतो. मोठमोठे घसरतात, तेथे लहान तरतात. मर्त्यभूमीच्या लोकांनी आपणास अनेकदा सहाय्य केले आहे. मानवांचे ते उपकार विसरू नका. कोणीही कोणास तुच्छ लेखू नये.” बृहस्पती म्हणाले.

“गुरुदेवांचे म्हणणे बरोबर आहे. आपणा सर्वांस मागे एकदा गर्व झाला होता, परंतु त्या ज्ञानदेवतेने सर्वांचा गर्व जिरवला. त्या वेळेस अग्नीला काडी जाळवेना, वा-याला काडी हालवेना, परमेश्वरी शक्ती कोठे असेल त्याचा नेम नाही. आपले पाप झाले तेवढे पुरे. आता आणखी आढ्यतेचे व गर्वाचे पाप तरी नको.” इंद्र म्हणाला.

“मानवजातीत कोणी आहे का महात्मा, हे पाहण्यासाठी वरुणदेव जाणार होते ना ?” अग्नीने विचारले.

“हो. ते असे म्हणाले होते. चला, आपण सारे त्यांच्याकडे जाऊ.” इंद्र म्हणाला.

सारे देव वरुणराजाकडे आले. वंदन करून देवेन्द्र म्हणाला, “हे धृतव्रता वरुणराजा, शत्रूचे पारिपात्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत. रिपू हटत नाही. आम्हास मार्ग सुचत नाही. माझे अमोघ असे वज्र, तेही त्या वृत्रसुराने काडीप्रमाणे मोडले. अशा प्रबळाशी कोण झुंजणार ? सारी शस्त्रास्त्रे व्यर्थ आहेत. मला तरी सृष्टीचा अंत आला असेच वाटत आहे.”

वरुणदेव म्हणाले, “शचीपते, तू म्हणतोस ती गोष्ट खरी. कोणातच आज त्राण नाही. व्रताचे तेज नाही. तुम्ही देव दुबळे झालात. मानवही तसेच. मानवांत मला पराक्रम दिसला नाही. काही महात्मे दिसले, परंतु वृत्राला दूर करील असे तेज त्यांच्याजवळ नाही. मी सारी पृथ्वी शोधली. निराश होऊन परत येणार होतो, परंतु मला एकदम दिव्यसुगंध आला. मी त्या दिशेकडे वळलो. तेथे मला एक महान विभूती आढळली. त्या विभूतीच्या तेजाने तुझे काम होईल.”

“कोठे आहे ती विभूती ? कोठे आहे तो महात्मा ? सांगा, त्याचे निवासस्थान सांगा. आम्ही सारे देव तेथे जाऊ व त्याच्या पाया पडू. त्या महात्म्याला स्तुतीची स्पृहा नसेल. आमचे प्रणाम पाहून तो गजबजेल. स्तुतीने त्यांना आम्ही मोह पाडू नाही इच्छित. त्यांना पडणारही नाही. आम्ही त्यांच्या पायांवर लोळण घेऊन म्हणू, ‘त्रिभूवनाचे रक्षण करा.’  वरुणदेवा, काय त्या विभूतीचे नाव ? धन्यतम नाव ? हा तपःसूर्य कोठे तपत आहे ? हा भूदेव कोठे वसत आहे ?” अशी सर्वांनी पृच्छा केली.

वरुणदेव म्हणाले, “इंद्रा, सुरश्रेष्ठा, त्या भूमीतील राजर्षींनी पूर्वी तुला अनेकदा साहाय्य दिले; ज्या भूमीत यज्ञाची, त्यागाची महती सदैव गाइली जात असते, जेथे लोक स्वधर्माचरण नीट व्हावे म्हणून थोडीफार तीर धडपड करीत असतात, त्याच भरतभूमीत तो महात्मा आहे. त्या भरतभूमीच्या पश्चिम दिग्भागी साबरमती नदीच्या तीरावर तो महात्मा तप करीत आहे. अत्यंत निर्मळ व पवित्र आहे त्याचे जीवन. निरहंकार, निष्काम मूर्ती, त्याच्याकडे सारे जाऊ या. सहाय्य मागू या.”