यज्ञ 25
इंद्र म्हणाला, “भगवान, आपला देह मागावयास मी आलो आहे. मी अगतिक आहे. त्रिभुवनाच्या रक्षणासाठी हे कठोर दान मी मागत आहे. आपल्या प्राणांची भिक्षा घाला. आपल्या या सुपूत, सुसंस्कृत देहाची भिक्षा घाला. तपश्चर्य़ेने पावन झालेला हा देह ! या देहातील अणुरेणू अपार सामर्थ्याने भरलेला आहे. आजपर्यंत आपण यज्ञ करीत आलात. विषयवासनांचे, कामनांचे, इंद्रियांचे बाह्यरसांचे, आसक्तीचे हवन केलेत. उत्तरोत्तर यज्ञ करून पवित्र संपादलेत. पावित्र्य म्हणजे चिरयज्ञ. घाण जाळणे. तुमच्या जीवनातील सारा खळमळ जळून गेला. आता शेवटचा महान यज्ञ करा. पवित्र जीवनाची आहुती घ्या. तुमचा देह आम्हास द्या.”
दधीचीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ते म्हणाले, “देवेन्द्रा, तू कठोर नाहीस. तू अत्यंत उदार आहेस. माझ्या या मातीचे तू सोने करीत आहेस. हा देह जगत्सेवेसाठी देता येत आहे, याहून धन्यतम, प्रियतम ते काय ? आज जीवन कृतार्थ झाले. तपश्चर्य़ा सुफल झाली. वैराग्य कृतकृत्य झाले. यज्ञदेव प्रसन्न झाला. हा देह शक्य तितका शुद्ध आहे. माझे जीवन शक्य तितके निर्मळ मी केले आहे. अजूनही दोष असतील ते तुम्हा थोरांच्या आशीर्वादाने खाक होवोत. निर्दोष एक परमेश्वर आहे. तुम्ही सारे संत मजजवळ ही माझी माती मागत आहात. मी आनंदाने देतो. माझ्या मातीचे सोने झाले. देवेन्द्रा, तु्म्ही कठोर नसून कारुण्यसिंधू आहात. तुम्ही प्राण मागत नसून प्राणदान करीत आहात. मरण देत नसून अमर करीत आहात. मूठभर माती व ही हाडे नेऊन मला परमात्मा अर्पित आहात. कवडी घेऊन त्रिभुवनाची संपत्ती देत आहात. ज्या तुमच्या नंदनवनात इच्छिलेले देणारे कल्पवृक्ष असतात, सकल कामना पुरवणा-या कामधेनू असतात, ते तुम्ही कठोर कसे व्हाल ? तुम्ही उदारांचे राणे आहात.”
ईश्वराला मी सदैव एक प्रार्थना करीत असे. त्याला म्हणत असे, ‘देवा, माझे असत्य घे व मला तुझे सत्य दे. माझा अंधार घे व तुझा प्रकाश मला दे. माझे मर्त्य शरीर घे व तुझे अमृतत्व मला दे.’ ती प्रार्थना परमेश्वराने आज ऐकली असे दिसते. आज माझे नवस पुरले. तळमळ शांत झाली. देवेन्द्रा, किती तुमचे उपकार मानू ? कसा होऊ तुमचा उतराई? हे जीवनाचे फूल मी तुम्हाला दिल्यावर आणखी द्यावयास मजजवळ काय आहे ? आता मी समाधिस्थ होतो. माझी ज्योती परंज्योती मिळवितो. ही जीवनाचा बुडबुडा चैतन्यसिंधूत मिसळून देतो. माझी लहानशी तान त्या गानसागरात मिळवतो. आधी मी स्नान करून येतो.”
असे म्हणून दधीची निघाले. स्नानार्थ निघाले. पाठोपाठ देव होते. इतक्यात वसिष्ठांना एक गोष्ट आठवली. दधीचींची थोर पत्नी, त्यांची मुले, यांची वसिष्ठांस आठवण झाली. ते वा-याला म्हणाले, “वायुदेवा, धावत जा. दधीचींच्या घरी जा. त्यांची थोर पत्नी व मुले यांना घेऊन ये. शेवटचे दर्शन त्यांना घेऊ दे. शेवटची पूर्णाहुती त्यांना पाहू दे.”
वायुदेव धावत गेला. दधीचीची पत्नी पतीच्या प्रेमामुळे जिवंत होती. तिचे त्यागमय जीवन मुलांना ऊब देत होते. वायुदेव दारात उभे राहिले.
“कोण आहात आपण ? देव दिसता.” पत्नी प्रणाम करून म्हणाली.