यज्ञ 9
अंधारातच लोक हिंडू लागले. जिकडतिकडे भीतीचे वातावरण पसरले. कोणी वाळलेला पाला पेटविला. कोणी घरी दिवे लावले. काहींच्या घरी तेल नव्हते, तेथे कोठला दिवा ? आणि रोज दिवे तरी कोण लावणार ? सारे उद्योग थांबले. विणकर विणीना, तेली तेल काढीना. शेतात कोण जाणार ? मळ्यात कोण जाणार ? सर्वत्र अंधार, अंधार !
दोन-चार दिवस उष्णता पुरली, परंतु पुढे भयंकर स्थिती आली. कोणास बाहेर पडवेना. हातपाय गारठून गेले. वारा नव्हता तरी गारठा होता. असह्य गारठा. वृक्ष-वनस्पती थंडीने करपून गेल्या. गाईंगुरे गोठ्यात मृतवत पडली. पाखरे मेल्यासारखी झाली. माद्या पिलांना पंखात घेत होत्या. पाखरे एकमेकांचे वैर विसरून एकमेकांच्या जवळ आली. एकमेकांच्या अंगाची ऊब एकमेकांस देऊ लागली. पशूही तसेच करू लागले. सिंह गारठले, ते हरणांच्या अंगाला चिकटून बसले. हरणांनी आपली शिंगे सिंहाच्या आयाळीत घुसविली. लांडग्यांच्या जवळ ससे येऊन राहिले. संकटात प्रेमधर्म आला. सूर्याचा प्रकाश गेला, परंतु प्रेमाचा प्रकाश आला. प्रेमाची ऊब मिळाली.
मानवांची त्रेधा नि तिरपीट. कोणाला उठवेना, फिरवेना, माता मुलांना कुशीत घेऊन पडून राहिल्या. काय खायला देणार, काय प्यायला देणार ? सर्वांचे प्राणच जावयाचे, परंतु अद्याप धुगधुगी होती. आकाशातील ता-यांची थोडीशी उष्णता येत होती आणि अज्ञात ऋषिमुनीची तपश्चर्य़ा- तीही ऊब देत होती.
“संतो भूमी तपसा धारयन्ति”
संत आपल्या तपश्चर्येने विश्वाचे धारण करतात. लहानमोठे असे हे मानव जातीतील तपःसूर्य, जगतीतलावरील या तपोज्योती, त्यांच्यापासून उष्णता मिळत होती. जग जगत होते. कसे तरी जगत होते. ना धड जीवन, ना धड मरण. ना धड जागृची, ना सुषुप्ती. केवळ विकल अशी दशा चराचराला आली. कोणी त्राता राहिला नाही.
“आई !” बाळ क्षीण स्वरात हाक मारी.
“काय बाळ !” असे माता म्हणे व त्याला घट्ट धरू बघे; परंतु हातात शक्ती नव्हती. डोळ्यांतही शक्ती नव्हती. अंधारात काही दिसेना आणि दिसले तरी काय उपयोग ? डोळे उघ़डले तर ते मिटण्याची शक्ती नसे. मिटले तर उघडण्याची शक्ती नसे. पाय लांब केले तर आखूड करता येत ना. आखूड केले तर लांब करता येत ना. एका कुशीवर वळले तर दुसया कुशीवर वळण्याची पंचाईत. सारे चमत्कारिक झाले. कण्हणे, विव्हळणे, त्याचीही शक्ती उरली नाही. पृथ्वी निःशब्द झाली. चलनवलनहीन झाली. परंतु धुगधुकगी होती. नाडी मंद उडत होती. हृदयाची क्रिया थो़डीतरी चालू होती.