यज्ञ 29
मी असुर आहे, मी पापी आहे; परंतु प्रभूच्या आज्ञेने मला पापी व्हावे लागले. तुम्हा सर्वांची परीक्षा घ्यावयास परमेश्वराने मला पाठविले होते. तुमच्यात यज्ञधर्म जिवंत आहे की नाही, ते पाहावयास प्रभूच्या आज्ञेने मी आलो होतो. तुमची कसोटी पाहण्यासाठी मला सारे करावे लागले. तुम्ही मला शिव्याशाप दिलेत, दुष्ट, पापी, अधम, चांडाळ म्हटलेत. माझ्या नावाने सर्वांनी बोटे मोडली, खडे फोडले; परंतु हे सारे मला सहन करावे लागले. कर्तव्य कठोर आहे. ईश्वराने सांगितले ते केले. ते जगाला रुचो वा न रुचो; स्वतःलाही रुचो वा न रुचो, त्याची इच्छा प्रमाण. देवेन्द्रा, सुर-नराची परीक्षा घेण्यासाठी असुरसंभव होत असतो. मानवजातीचे, तुम्हा सर्वांचे हृदय नीट शाबूत आहे की नाही, हे ठोकठाकून आम्ही पाहावयास येत असतो. आम्ही असुर म्हणजे जगाची परीक्षा घेणारे परमेश्वराचे दूत आहोत. त्याग, प्रेम, बंधुभाव, यज्ञ वगैरे महान तत्त्वे जगात जिवंत आहेत की नाहीत, हे पाहावयासाठी प्रभू आम्हास पाठवीत असतो. असुर हेही प्रभूचा आदेश पार पाडणारे असतात, हे ध्यानात धरा. असुरांचा तिटकारा नका करू. ईश्वराच्या नाटकात आम्हाला जी भूमिका मिळते, ती आम्ही पार पडतो. असुर होण्याची भूमीका कोणी तरी पार पाडलीच पाहिजे. खरे ना ? असो. देवेन्द्रा, हा घे माझा शेवटटा प्रणाम. ही सकल चराचराला अंतिम वंदना. आता येऊ दे ते वज्र, प्रेममय हृदय. मी करांजली जोडून उभा आहे.”
तो असुर वृत्र हात जोडून साश्रू असा उभा होता. इन्द्राने ते अस्थिमय वज्र सोडले. ते निर्मळ हृदयपुष्प येऊ लागले. चराचरात परिमल भरला; गोड सुगंध दशदिशांत दरवळला. मंगल वारे वाहू लागले. जी छाती इंद्राच्या वज्रासमोर निष्कंप राहिली होती, त्या छातीला स्पर्श करून विदीर्ण करण्यासाठी ते हृदयवज्र येत होते. ती मू्र्त तपस्या येत होती, मूर्त महान यज्ञ येत होता. त्रिभुवनातील पावित्र्य व मांगल्य येत होते, भेदातीत प्रेम येत होते. वृत्र भावनानी उचंबळत होता. ते हृदयवज्र आले. वृत्राच्या हृदयाला स्पर्श करते झाले. ती पहाडी छाती दुभंगली, बंद हृदय उघडले, कठोर हृदय विरघळले, कठोर जीवन वितळले. वृत्राचा देह पडला. त्याचा आत्मा परमात्म्यात मिळाला.
वृत्राच्या हृदयकपाटात कोंडलेल्या सहस्त्रावधी तेजःप्रसवा धेनू धावतच बाहेर आल्या. किरीटधारी भगवान सूर्यनारायण गाईपाठोपाठ उभा होता. बुभुक्षित जगाला त्या गाईंनी लक्षावधी तेजःपयाच्या धारा सोडल्या. जगाला टवटवी आली. झाडे हिरवी दिसू लागली. पाखरांचे फिकट रंग तजेलदार झाले. फुले हसली. मुलेमुली, नारीनर अंगणात नाचू लागली. “जय सूर्यनारायणा !” असे म्हणून नमस्कार करती झाली. ऋषींनी छाट्या फडकविल्या. बायकांनी फुले फेकली. मुलांनी टाळ्या वाजविल्या. चराचराला आनंद झाला. देवांनी दुंदुभी वाजविल्या. गंधर्व गाऊ लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. सृष्टीत आनंद भरून राहिला. विश्वयंत्र पुन्हा सुरळीत सुरू झाले. परमेश्वराचा सर्व त्रिभुवनाने स्तव आरंभिला. भूतलावर सारी मानवजात उभी होती. ‘हे सृष्टीनियंत्या परमेश्वरा, विश्वरूपा, विश्वेश्वरा, आम्हाला अतःपर सद्बुधी दे. आमच्यात त्यागबुद्धी जिवंत ठेव, यज्ञपूजा जिवंत ठेव. दधीची भगवानांचे हे महान बलिदान, त्याची आम्हास सदैव स्मृती राहो !’