यज्ञ 26
“मी वायुदेव आहे.”
“सूर्यदेव कोठे आहे ?”
“कोणा शत्रूने पळविला.”
“मग जगाचे कसे होणार ?”
“कोणी महात्मा भेटला तर तो हे संकट टाळील. ज्याच्या जीवनात महान यज्ञतत्त्व ओतप्रोत भरलेले आहे. तोच तारील. त्या शत्रूवर इतर शस्त्रे चालत नाहीत.”
“मग कोण आहे असा महात्मा ?”
“आपला पती. त्यांच्याजवळ आम्ही प्राणभिक्षा मागितली आहे. त्यांचा देह आम्हाला पाहिजे आहे. त्यांचे प्रेममय हृदय पाहिजे आहे. हृदयाभोवतीच्या अस्थी घेऊन मध्ये हृदय बसवून त्याचे वज्र करणार आहोत. चराचरावर प्रेम करणा-या महात्म्याचे ते हृदय. त्या हृदयाचे ते वज्र शत्रूला विरघळवील. ते प्रेमवज्र शत्रूला जिंकील. दधीची भगवान लवकरच देह सोडतील. तुम्हाला मी नेण्यासाठी आलो आहे. शेवटचे दर्शन घ्या. आम्हा सर्वांना क्षमा करा. तुमच्या सौभाग्याचे दान आम्ही मागत आहोत. पतिव्रते, कृपा कर. जगाचे कल्याण होऊ दे.”
“माझा पती मरत नसून अमर होत आहे. अखंड सौभाग्य मला मिळत आहे. चला, मी येते. मुलांना घेऊन येते. शेवटचे दर्शन घेईन, प्रणाम करीन. मुले पायांवर पडतील. कृतार्थ होतील.” असे म्हणून पत्नी यायला निघाली. सारी मुले बरोबर निघाली. वायुदेव एका क्षणात त्यांना घेऊन आला.
“शिवेऽहं धन्योऽहं परमकृतकृत्योऽहमधुना।”
असे भावनाकंप ओठांनी म्हणत दधीची साबरमतीचे स्नान करते झाले. त्यांनी साबरमतीस, त्या आपोमातेस, लोकमातेस हात जोडले. ते म्हणाले, “आई, तुझ्या पाण्याने तू मला अपहतमात्मा केलेस. तुझ्या पुण्यजलामुळे माझे जीवन निष्पाप झाले. ‘इदमापः प्रवहत यत्किंच दुरितं मयि’ ही माझी प्रार्थना तुझ्या पाण्याने ऐकली. तुझ्या पाण्याने माझे पाप धुतले गेले. वासनांनी बरबटलेल्या या बाळाला हे माते, तू शत तरंगांनी प्रत्यही धुतलेस. म्हणून हे जीवन आज जगाच्या सेवेला देता येत आहे.”