Android app on Google Play

 

सौप्तिकपर्व

 

आचार्य कृप, कृतवर्मा आणि अश्वत्थामा हे कौरवांच्या बाजूचे वीर अरण्यातील एका वृक्षाच्या छायेखाली रात्र झाल्यावर गेले आणि झोपले. अश्वत्थाम्याला झोप लागली नाही; तो जागाच होता.

रात्री एका घुबडाने त्या झाडावरील शेकडो निद्रिस्त पक्ष्यांचा फडशा पाडला. तो अश्वत्थाम्याने पाहिला. त्याच्या डोक्यात एक भयंकर कल्पना आली. कृतवर्मा आणि कृपाचार्य ह्या दोघांना त्याने जागे केले आणि लगेच रात्री पांडवकुलाचा संहार करण्याचा आपले बेत सांगितला.

ते तिघेही पांडवांच्या शिबिरात गेले. अंधारात अश्वत्थाम्याने धृष्टद्युग्माच्या तंबूत जाऊन अगोदर त्याला ठार मारले. कारण द्रोणाचार्यांना ते समाधीत असताना धृष्टद्युग्माने ठार केले होते. नंतर प्रत्येक तंबूत जाऊन जे जे वीर झोपले होते त्या सगळ्यांचा झोपेतच खातमा केला. ह्यात द्रौपदीचे सर्व पुत्र मारले गेले. प्रत्यक्ष पांडव मात्र सापडले नाहीत.


राहिलेल्या वीरांना नष्ट करण्याकरता सर्व छावणीला आग लावून दिली. सगळे गेले; पांडव तेवढे जिवंत राहिले. अश्वत्थाम्याने आपण केलेल्या ह्या संहाराची वार्ता दुर्योधनाला सांगितली. दुर्योधनाने त्याची प्रशंसा करून प्राण सोडला.

पांडव अश्वत्थाम्याचे पारिपत्य करण्यासाठी गेले, तेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले. त्याच्या प्रतिकारार्थ अर्जुनाने उलट तेच अस्त्र सोडले. त्या अस्त्रांच्या आगीत सर्व जग जळणार, अशी अवस्था उत्पन्न झाली म्हणून व्यास आणि नारदमुनी ह्यांनी अस्त्रे मागे घेण्यास सांगितले आणि अनर्थ टाळला.

अश्वत्थाम्याच्या मस्तकावर एक दिव्य मणी होता. व्यासांच्या उपदेशानुसार तो त्याने भीमाच्या हाती दिला. ही त्याच्या पराजयाची खूण होती.