Get it on Google Play
Download on the App Store

महागाथेचे स्वरूप आणि उपकथा

प्रारंभीच निर्दिष्ट केल्याप्रमाणे पाणिनीच्या सूत्रांवरून असे लक्षात येते की, महाभारत हे नाव प्रथमपासूनच प्राप्त झालेले असावे; भारत ह्या ग्रंथाचा बराच विस्तार कालांतराने झाल्यानंतर महाभारत हे नाव प्राप्त झाले नसावे; कारण महान हे विशेषण भारतसंग्रामाचे विशेषण आहे आणि तो संग्राम महासर्वसंहारक होता, ही गोष्ठ लक्षात घेऊन विकल्पाने भारत किंवा महाभारत असे त्या संग्रामाला प्रथमपासूनच म्हणत असावेत. परंतु यासंबंधी निश्चित असे काहीच सांगता येत नाही; कारण वारंवार भर पडत गेली; त्यामुळे ग्रंथाची श्लोकसंख्या वाढली. ग्रंथाचा भार मोठा झाला म्हणून त्याला महाभारत म्हणतात; असे आदिपर्वातच म्हटले आहे.

आश्वलायन गृह्यसूत्रातील ऋषितर्पणात चार व्यासशिष्य यांचा निर्देश आल्यानंतर भारताचार्य व महाभारताचार्य असे वेगवेगळे निर्देश येतात. महाभारताचे क्रमाने तीन संस्कार झाले, याची नोंद महाभारतातच आहे. कृष्णद्वैपायनांनी शिष्य वैशंपायन यांना हा इतिहास पढविला; वैशंपायन ऋषींनी पांडवांचा उत्तराधिकारी राजा परिक्षित याचा पुत्र जनमेजय याला त्याने आरंभिलेल्या सर्पसत्राच्या वेळी ही भारतकथा सांगितली त्यावेळी सूत लोमहर्षण याचा पुत्र उग्रश्रवा हा उपस्थित होता. राजांच्या, ऋषींच्या, देवासुर, राक्षस, यक्षादिकांच्या व त्यांच्या वंशांच्या कथा, वीरकथा, इतर धार्मिक आणि ऐहिक घटनांच्या कथा, विश्वोत्पत्ती व विश्वरचना यांची वर्णने वा पुराणे रचण्याचा व सांगण्याचा व्यवसाय वंशपरंपरेने करीत असलेल्या जमातीला किंवा अशा एका संकर जातीला सूतही संज्ञा होती.

भृगुकुलोत्पन्न शौनक ऋषींनी नैमिषारण्यात आरंभिलेल्या द्वादश वार्षिक सत्राच्या समारंभात उपस्थित असलेल्या ऋषींच्या विनंतीवरून महाभारत त्या सत्रात उग्रश्रव्याने सांगितले. तात्पर्य, एकंदर तिघांचे संस्कार होऊन हा ग्रंथ वाढत गेला. या ग्रंथातच पहिल्या अध्यायात म्हटले आहे की, मनूच्या निर्देशापासून भारत ग्रंथ सुरू होतो, असे काही म्हणतात. आस्तिक ऋषीची कथा असलेल्या उपपर्वापासून (भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थाप्रत आदिपर्व अध्याय−४−५३) हा ग्रंथ सुरू होतो असे कित्येकांचे मत आहे. उपरिचर राजाच्या कथेपासून (आदिपर्व अध्याय ५७) ग्रंथ सुरू होतो असे कित्येक मानतात. आस्तिक उपपर्वाच्या अखेरीस (आदिपर्व अध्याय ५३) शौनक ऋषी सूत उग्रश्रवा याला म्हणतात की, कृष्णद्वैपायनांनी सांगितलेले महाभारत आख्यान मी ऐकू इच्छितो. तेव्हा सूत त्याला सांगतो की, हे मोठे आख्यान महाभारत पहिल्यापासून आता तुला सांगतो. त्यानंतर आदिवंशावतरण हे उपपर्व येते. त्या उपपर्वातील पहिल्या छोट्याशा दोन अध्यायांत (अ. ५४श्लोक-२४; अ ५५−श्लोक−४३)महाभारत हे आख्यान वैशंपायनांनी जनमेजयाला संक्षेपाने (समासेन) सांगितले. तेव्हा जनमेजय म्हणतो, हे आख्यान मला विस्ताराने सांगा; मला एवढ्यात समाधान नाही.

जनमेजयाला वैशंपायनांनी महाभारत आख्यान प्रथम अगदी संक्षेपाने सांगितले आणि मग पुन्हा तेच आख्यान विस्ताराने सांगण्यास सुरूवात केली. तेव्हा वैशंपायन प्रस्तावनेत म्हणतातहे महाभारत आख्यान शत सहस्त्र श्लोकांचे म्हणजे लक्ष श्लोकांचे, सत्यवतीचा पुत्र व्यास याने सांगितले आहे; हा जय नावाचा इतिहास आहे; हे अर्थशास्त्र, धर्मशास्त्र आणि मोक्षशास्त्र आहे; याला महाभारत म्हणतात. याचे कारण भरतवंशीय लोकांचा महान जन्म म्हणजे त्यांचे महान जीवन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्यांविषयी ह्यात जे सांगितले आहे तेच अन्यत्र सांगितलेले असते. जे येथे सांगितले नाही ते कोठेही मिळायचे नाही

आदिपर्व अध्याय ५६ या ठिकाणी हा महाभारत ग्रंथ लक्ष श्लोकात्मक आहे असे म्हटले; परंतु आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायात (श्लोक−६१) म्हटले आहे की, २४ सहस्त्र श्लोकांची ही भारतसंहिता, उपाख्याने वगळून, कृष्णद्वैपायन व्यासांनी तयार केली. तेवढ्याला भारत असे विद्वान लोक म्हणतात. कौरव-पांडवांच्या पूर्वजांची कथा धरून कौरव−पांडवांच्या प्रारंभापासून अखेरपर्यंतच्या जीवनाच्या कथेचा गाभा आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्वापर्यंत सापडतो. परंतु आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्वापर्यंत अनेक आख्याने व उपाख्याने मधूनमधून भरण्यात आली आहेत. त्यांतील काही मूळ कथेशी जुळणारी आहेत; काही जुळवून घेतली आहेत; काही आडवळणी व विसंगत आहेत. पहिले दोन अध्याय वगळून आदिपर्वाच्या प्रारंभी, भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या चिकित्सक आवृत्तीच्या अनुसाराने, पहिल्या ५३ अध्यायांमध्ये कौरव-पांडवांच्या कथेशी संबंध नसलेल्या निराळ्याच कथा भरलेल्या आहेत.


ययाती व देवयानी यांची कथा अखेरीस वैराग्यकाव्य बनले आहे. मुळात प्रथम तसे नसेल. नल-दमयंती आख्यान हे स्वतंत्र महाकाव्य जागतिक वाङ्मयात प्रतिष्ठा पावलेले आहे; ते या ग्रंथात मागाहून सामाविष्ट केलेले दिसते. सावित्री−सत्यवान यांची भव्योदात्त कथा अशीच मागाहून अन्तर्भूत केलेली दिसते. कद्रू आणि विनता यांचे आख्यान, एक विशाल असे निसर्गसृष्टीचे रूपक आहे कद्रू म्हणजे पृथ्वी, तिचे पुत्र सर्प; विनता म्हणजे नभोमंडल, कढईसारखे बाक असलेले; नभोमंडलाचा पुत्र गरूड आकाशात भराऱ्या मारणारा. नाग व गरूड यांची कथा, भृगुवंशाची व विशेषतः च्यवन व सुकन्या यांची कथा, मनू आणि मासा यांची कथा, भार्गव परशुराम कथा, रामकथा, कार्तवीर्यार्जुन कथा, वसिष्ठ-विश्वामित्र कथा अशी पुष्कळ आख्याने-उपाख्याने काही जुळणारी, काही जुळवून घेतलेली व काही तशीच या ग्रंथात भरली आहेत. म्हणून भारतीय साहित्याचा इतिहास लिहिणारे जर्मन पंडित विंटरनिट्‌झ महाभारताला अनेक ग्रंथांचा संग्रह म्हणून निर्दिष्ट करतात. काही आख्याने आणि उपाख्याने मूळ गाभ्याशी अधिक जुळणारी अशी दिसतात. उदा., वनपर्वातील अजगर होऊन पडलेला राजा नहुष आणि युधिष्ठिर यांचा संवाद किंवा यक्षयुद्धिष्ठिर संवाद, भीष्मपर्वातील भगवद्‌गीता मूळ कथानकाशी, तिचा सारांश लक्षात घेता सुसंगत दिसते; परंतु दोन्ही बाजूंची सैन्ये एकमेकांशी भिडली असता. शस्त्रसंपात प्रवृत्त झाला असताना इतकी दीर्घकाळ तत्त्वचर्चा चाललेली विसंगत वाटते.