Get it on Google Play
Download on the App Store

भगवद्‌गीता


महाभारताख्यानाच्या संदर्भात प्राचीन भारतीय संस्कृतीचा वैचारिक परमोत्कर्ष म्हणजे भगवद्‌गीता होय, असे म्हणता येते. विश्वसाहित्यातील तिचे उच्चच स्थान निर्विवादपणे आज मान्य झाले आहे. विश्वव्यापी विनाशाच्या अपरिहार्य परिणतीच्या दर्शनाने मानवी मन गलितधैर्य बनता कामा नये; तटस्थ, अलिप्त, शांत, तत्त्वदर्शी प्रज्ञेच्या सामर्थाने प्रपंचात मानवाने टिकले पाहिले, असा संदेश गीता देते. मानवी जीवनाचा अर्थ अनंत व अगाध विश्वाच्या म्हणजे विश्वरूपदर्शनाच्या संदर्भात लक्षात घेऊन गीतेने हा संदेश दिला आहे. महाभारतसंग्रामाचा तो ध्वनितार्थ आहे. वासुदेव कृष्ण हा पुरूषोत्तम, प्रत्यक्ष विष्णूच भगवद्गीतेचा उपदेष्टा आहे. मूलतः महाभारत हा वासुदेव भक्तिसंप्रदायातला ग्रंथ आहे; परंतु त्यात अर्जुनाला पाशुपत अस्त्र देणारा पशुपती शिवही मधूनमधून प्रकट होतो; देवीही एखाद्या वेळी झळकते. हिंदू धर्मातील सर्व संप्रदायांना मान्य असा हा ग्रंथ आहे. मुख्यतः हे महाकाव्य आहे. या महाकाव्यामध्ये धीरोदात्त पुरूष आणि महनीय महिला यांचे जीवन हे केंद्रस्थानी आहे. अद्‌भूत कथानकांच्या स्वरूपात दडलेल्या अतिप्राचीन इतिहास त्यांत सूचित केला आहे. राजनीती, धर्मशास्त्र आणि तत्त्वज्ञान त्याचप्रमाणे तीर्थकथांच्या संदर्भांतील धार्मिक कर्मकांड यांचाही ऊहापोह यात केलेला आहे. कमीत कमी दोन सहस्त्र वर्षे मान्य झालेला हा ग्रंथ आहे.