Android app on Google Play

 

विराटपर्व

 

यमधर्माच्या आदेशाप्रमाणे पांडव विराट नगरीकडे जाण्यास निघाले. नगरीजवळ पांडवांनी आपली शस्त्रे एका शमीच्या वृक्षावर लपवून ठेवली.

तेथे पोहोचल्यावर विराट राजाच्या आज्ञेनुसार द्यूतक्रीडानिपुण युधिष्ठिर कंक ब्राह्मम म्हणून राजाच्या सेवेत राहिले. भीमसेन पाकनिपुण म्हणून विराटाच्या पाकशाळेत बल्लब म्हणून राहिला. अर्जुनाला तो स्वर्गात गेला असताना उर्वशीने, तिचा स्वीकार न केल्यामुळे, शाप दिला होता की, एक वर्ष तू षंढ होशील. तो शाप अर्जुनाच्या पथ्यावर पडला. तो बृहन्नडा हे नाव घेऊन स्त्रीवेशात नृत्यशाळेत राजकुलातील कन्यांना नृत्यगीत शिकवत राहिला. नकुल हा अश्वविद्यापारंगत होता; त्याने अश्वशालेवर नेमणूक करून घेतली. सहदेव गोरक्षणविद्येत कुशल असल्यामुळे त्याने गोशालेवर नेमणूक करून घेतली. द्रौपदी ही सैरंध्री नाव धारण करून अंतःपुरातील राण्यांची आणि स्त्रियांची केशप्रसाधनादी कार्ये करू लागली. राजमहालात सेवा करीत असता त्यांना कोणीही ओळखले नाही. दहा महिने निर्विघ्नपणे पार पडले.

 विराट राजाची राणी सुदेष्णा हिचा कीचक नावाचा भाऊ होता. त्याची नजर सैरंध्रीवर गेली. त्याची वासना चाळवली. त्याने सुदेष्णेला सांगितले की, सैरंध्रीला माझ्या महालात पाठवून दे. त्याप्रमाणे सुदेष्णेने सैरंध्रीला आज्ञा केली, की किचकाकडून मद्य घेऊन ये. सैरंध्री निरूपाय होऊन कीचकाच्या महालात गेली. कीचकाने तिचा हात धरला. तिने कशीबशी आपली सुटका करून घेतली.


रात्री भीमाला भेटून आपले गाऱ्हाणे सांगितले. भिमाने एक युक्ती योजली. सैरंध्रीला सांगितले की, रात्री नृत्यशाळेत त्याच्याशी भेटण्याचा संकेत कर. नंतर मी पाहून घेतो. रात्री नृत्यशाळेत कीचकाला सैरंध्री न भेटता भीमच भेटला. भीमाने कीचकाला बुकलून यमसदनास पाठविले. हा अनर्थ राजा विराटाला समजला; पण कीचकाची वाट कोणी लावली हे काही कोणाला समजू शकले नाही. विराट राजाने सुदेष्णेला संदेश पाठवला की, सैरंध्रीला ह्यापुढे आश्रय देऊ नको. अज्ञातवासाच्या मुदतीचा विचार करून सुदेष्णेला सैरंध्रीने उत्तर दिले की, मला फक्त तेरा दिवसाचां अवधी दे. मला अगोदर घालविले, तर माझे गंधर्व पती खवळतील आणि तुमच्या राज्यावर संकट येईल. नाईलाजाने सैरंध्रीला तेवढी मुदत दिली.

 अज्ञातवास पूर्ण एक वर्ष पुरा करता आला नाही तर, म्हणजे वर्षाच्या आत पांडव उघडकीस आले तर, त्यांना पुन्हा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास पतकरावा लागेल, अशी द्यूतातली अट होती. कोरवांनी त्यांना हुडकून काढण्यासाठी देशोदेशी हेर पेरले होते. बलाढ्य किचकाला कुणीतरी मारले आहे, अशी वार्ता कौरवांना मिळाल्यामुळे त्यांची खात्री झाली, की भीमावाचून हे अत्यंत कठीण कर्म अन्य कोणालाच जमणे शक्य नाही. पांडवांना प्रकट होणे भाग पडावे म्हणून विराट नगरीवर विराटाचे गोधन हिरावून नेण्याकरता कौरवांनी आक्रमण केले.

विराट राजाला शत्रुसैन्याने घेरले. परंतु विराट राजाला भीमाने शर्थीने पराक्रम करून सोडविले. विराटपुत्र उत्तर हे प्रचंड सैन्य पाहून भेदरला, तेव्हा बृहन्नडा पुढे आली. या बृहन्नडेने म्हणजे अर्जुनाने, शमी वृक्षावरची आपली शस्त्रे उतरली आणि कौरवांशी अपूर्व शौर्याने तो लढला.

दुर्योधनास वाटत होते, की पांडवांच्या अज्ञातवासाचे वर्ष अजून पूर्ण व्हावयाचे आहे. त्याआधी प्रकट झाल्यामुळे त्यांना पुन्हा वनवास आणि अज्ञातवास पतकरावा लागेल; परंतु भीष्मांनी त्याचा भ्रम दूर केला. सांगितले, की अज्ञातवासाचे वर्ष संपले आहे. पांडवांनी आपला पण पूर्ण केला आहे.

दुर्योधन खिन्न झाला व सैन्य घेऊन परत गेला. पांडवांनी वेशांतर केले व विराटापुढे खऱ्या रूपात प्रकट झाले. विराटाने पांडवांचा सत्कार केला आणि युधिष्ठिरांची क्षमा मागितली. विराटाने आपली कन्या उत्तरा अभिमन्यूला दिली. उत्तरा व अभिमन्यू यांचा विवाह थाटाने संपन्न झाला.