Android app on Google Play

 

पाठवृत्त्या आणि संस्करणे

 

महाभारताच्या अनेक पाठावृत्त्या हिंदुस्थानच्या निरनिराळ्या लिपींमध्ये भिन्नभिन्न प्रदेशांत मान्यता पावलेल्या आढळतात. त्यांच्यामध्ये मजकूर पुढचा मागे व मागचा पुढे झालेला दिसतो. अनेक अध्याय वा श्लोक कमीजास्त आहेत. सुमरे १२ हजार श्लोकसंख्यांचा फरक आढळतो. उदा., कुंभकोणम प्रत. मजकुराची विसंगती अनेक ठिकाणी दिसते. उदा., जतुगृहदाहउपपर्व. त्या सगळ्या पाठावृत्त्या तपासून कोणती पाठीवृत्ती सगळ्यांत प्राचीन असावी, हे निश्चित करून व चिकित्सक पाठावृत्ती संपादून प्रकाशित करण्याकरिता पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्यामंदिराने डॉ. व्ही. एस्. सुकथनकर यांच्या नेतृत्वाखाली संपादनकार्यालय स्थापित केले. चिकित्सक आवृत्ती संपादून सु. ४० वर्षांत निर्माण केली. जुन्यातली जुनी चिकित्सक पाठावृत्ती आता वाचकांच्या हाती पडली आहे. या संपादकांनी आज ज्या अनेक पाठावृत्त्या उपलब्ध आहेत, त्यांचे विभाजन उत्तर भारतीय पाठावृत्त्या व दक्षिण भारतीय पाठावृत्त्या अशा दोन वर्गांत केले. उत्तर भारतीय पाठावृत्त्या शारदा (काश्मीरी), नेपाळी, मैथिली, बंगाली व देवनागरी या पाच लिप्यांमध्ये आणि दक्षिण भारतीय पाठावृत्त्या तेलुगू, ग्रंथ, मलयाळम् आणि देवनागरी लिपींमध्ये उपलब्ध आहेत. त्या सगळ्या तपासून ही चिकित्सक पाठावृत्ती प्रकाशित केली आहे.


 सध्या उपलब्ध असलेल्या सर्व पाठावृत्त्यांमधील महाभारताची एकंदर १८ पर्वे आहेत. पर्व म्हणजे विभाग. हरिवंश हे खिल, १९ वे पर्व. प्रत्येक पर्वात अनेक उपपर्वे, उपपर्वे अध्यायांमध्ये आणि अध्याय श्लोकांमध्ये अशी रचना आहे. क्वचित काही अध्याय हे गद्यरूप आहेत. सामान्यतः सर्व १८ पर्वांची शीर्षके लक्षात घेतली, तर ती सर्व शीर्षके क्रमाने विकास पावणाऱ्या कथेची विषयदर्शक शीर्षके आहेत, ही गोष्ठ वाचकांच्या ध्यानात भरते.

(१) आदिपर्व, (२) सभापर्व, (३) वनपर्व, (४) विराटपर्व, (५) उद्योग पर्व, (६) भीष्म पर्व, (७) द्रोण पर्व, (८) कर्ण पर्व, (९) शल्य पर्व, (१०) सौप्तिक पर्व, (११) स्त्री पर्व, (१२) शांती पर्व, (१३) अनुशासन पर्व, (१४) आश्वमेधिक पर्व, (१५) आश्रमवासिक पर्व, (१६) मौसल पर्व, (१७) महाप्रस्थानिक पर्व, (१८) स्वर्गारोहण पर्व. हरिवंश हे पर्व खिल म्हणजे परिशिष्ट किंवा मागून जोडलेले एकोणिसावे पर्व होय.

प्रत्यक्ष महाभारतात कृष्णकथा नाही. ती कथा विस्ताराने हरिवंशात सांगितली आहे.महाभारताची रचना किंवा महाभारताची निरनिराळ्या वेळी झालेली संस्करणे म्हणजे व्यासांची रचना, त्यावरील वैशंपायनांचा संस्कार आणि त्यानंतर सूत उग्रश्रव्याने केलेला संस्कार एवढ्यावरच महाभारताची संस्करणे थांबली नाहीत. भृगुकुलातील ऋषींनीही महाभारतावर नंतर केलेला संस्कार स्पष्ट दिसतो. या गोष्टीकडे व्ही. एस्. सुकथनकर यांनी चिकित्सकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भृगुकुलातील सर्वांत प्रख्यात पुरूष म्हणजे परशुराम किंवा भार्गवराम होय. याच्या अनेक कथा या ग्रंथात गोवल्या आहेत. आदिपर्वातल्या पौलोम व पौष्य या उपपर्वातील अधिकांश भाग भृगुवंशीयांच्या कथांनी भरलेला आहे. वस्तुतः भार्गवरामाच्या कथा किंवा रुरू आणि च्यवनऋषीची कथा वगळली असती, तरी या भारत कथेत अपूर्णता दिसली नसती. भरतवंशाची कथा सुरू होण्याच्या अगोदरच भार्गव वंशाची कथा सुरू होते. हे एकापरी विसंगत व विचित्र दिसते.