Get it on Google Play
Download on the App Store

वनपर्व

पांडव द्रौपदीसह वनवासाला निघाले, त्यांच्या पाठीमागे नागरिकही मोठ्या संख्येने पांडवांबरोबर निघाले. युधिष्ठिरांनी नम्रतापूर्वक नागरिकांना परत पाठविले. मोठा ब्राह्मणसमुदाय मात्र गंगेच्या तटावरील वटवृक्षापर्यंत त्यांच्या पाठीमागून आला. त्या मुनिगणाच्या पोषणाची जबाबदारी आपणास पार पाडता येणार नाही, असे युधिष्ठिरांच्या लक्षात आले. आपले अकिंचनत्व आपणास मुनिजनांची सेवा करण्यास असमर्थ करते, हे पाहून त्यांना दुःख झाले. पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषी यांनी धर्मराजांना सूर्योपासना सांगितली. सूर्याने प्रसन्न होऊन त्यांना अक्षय्य स्थाली अगणित मुनिपोषणाकरता दिली.


वनातल्या मुक्कामात पांडवांवर एका रात्री किर्मीरनामक राक्षस चाल करून आला. भीमाने त्याला ठार केले. पांडवांना वनवास पतकरावा लागला, ही वार्ता द्वारकेत श्रीकृष्णाला समजली. श्रीकृष्ण भेटीस आला व म्हणाला की, मी दुर्योधनावर हल्ला करून त्याला नष्ट करतो. ही गोष्ट युधिष्ठिरांनी अमान्य केली.

द्वैपायन व्यास पांडवांच्या भेटीस आले. वनवास व अज्ञातवास संपल्यावर राज्याकरता कौरवांशी लढावेच लागेल; आतापासून युद्धाची तयारी करा; असा उपदेश केला आणि व्यास अंतर्धान पावले. ही गोष्ट पांडव द्वैतवनात असताना घडली.

अर्जुन शिवापासून पाशुपतास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी हिमालयातील इंद्रकील पर्वतावर तपश्चर्यार्थ गेला. अर्जुन त्या पर्वतावरील वनामधील एका वराहाची शिकार करीत असता, अर्जुनाची कसोटी पाहण्याकरिता किरातवेशधारी शंकराने त्याच क्षणी आपलाही बाण त्या वराहावर सोडला. त्यामुळे अर्जुन व शंकर यांच्यात युद्ध जुंपले. अखेर अर्जुनाची शक्ती शंकराने अजमावली आणि संतुष्ट होऊन त्याला पाशुपतास्त्र दिले. अष्टादिक्पालांनी आपापल्या शक्ती अर्जुनाला दिल्या. अर्जुन स्वर्गात गेला. तेथे इंद्राने अर्जुनाला आपली अस्त्रविद्या शिकविली.

अर्जुन तपश्चर्येला गेला असताना लोमश ऋषींना बरोबर घेऊन पांडवांनी तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रा संपवून पांडव गंधमादन पर्वतावर गेले. अर्जुन स्वर्गातून खाली उतरला व गंधमादन पर्वतावर आपल्या बंधूंना परत भेटला. ते सगळे मिळून द्वैतवनात पुन्हा परतले.

कौरवांना हे वर्तमान समजले आणि आपल्या वैभवाचे प्रदर्शनकरून पांडवांना खिजवण्याकरता द्वैतवनात शिरले. चित्रसेन गंधर्वाला दुर्योधनाचा हा दुष्टपणा रूचला नाही. त्याने कौरवांवर हल्ला करून दुर्योधनाला बंदिवान केले. दुर्योधनाचे अनुयायी ही वार्ता घेऊन युधिष्ठिरांकडे आले. युधिष्ठिरांनी दुर्योधनाला सोडवून आणण्याचा भीमार्जुनांना आदेश दिला; कारण दुर्योधनाला चित्रसेन गंधर्वाच्या तावडीतून मुक्त न केल्यास कुरूकुलाचा अपमान होतो. युधिष्ठिर म्हणाले, आपण आपसांत लढू तेव्हा तिकडे शंभर इकडे पाच; पण परक्यांशी प्रसंग असेल तेव्हा आपण पाच अधिक शंभर. भीमार्जुनांनी दुर्योधनाला चित्रसेनाच्या कचाट्यातून सोडवून आणले.

पांडवांनी अखेरचे वर्ष द्वैतवनात काढले. या १२ वर्षांच्या अवधीमध्ये अनेक संकटे आली. त्यांतून उत्तीर्ण झाले. अनेक साहसे केली. अखेरच्या वर्षातही पुनः एक संकट आले. एका ब्राह्मणाची अरणी म्हणजे अग्नी निर्माण करण्याचे लाकडी साधन सांबराच्या शिंगात अडकली व ते सांबर त्या अरणीसह लांब जंगलात गेले. तो ब्राह्मण पांडवांकडे आला व म्हणाला, माझी अरणी त्या सांबराला गाठून परत आणून द्या. त्या सांबराचा पाठलाग करीत पांडवांना दूर जंगलात जावे लागले.

दुपारची वेळ झाली होती. सगळे तहानेने व्याकुळ झाले. पाण्याच्या शोधाकरता नकुलाला युधिष्ठिरांनी पाठविले. जवळच एक पाण्याने भरलेले तळे दिसले. त्या तळ्याजवळ जाऊन नकुल पाण्याची ओंजळ भरतो, तोच ताच त्या तळ्याच्या काठावरील एका यक्षाने त्याला मज्जाव केला व म्हटले की, माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय पाणी पिऊ नकोस. नकुलाने त्या यक्षाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले; पाणी प्याला आणि मरून पडला. बाकीचे तिघे नंतर आले; त्यांचीही तीच गत झाली. अखेर युधिष्ठिर आले. त्यांनी यक्षाची आज्ञा मान्य केली. सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यक्ष प्रसन्न झाला.

यक्ष युधिष्ठिरांना म्हणाला, तुमच्या मृत बंधूंपैकी कोणातरी एकाला पुनर्जीवन देईन. कोणाला देऊ ? युधिष्ठिर म्हणाले, मी कुंतीचा एक आहेच; माद्रीचा एक जिवंत व्हावा. नकुलाला पुनर्जीवन दे. युधिष्ठिरांची ही समबुद्धी पाहून यक्षाने चारी भावांना उठविले. हा यक्ष म्हणजे यमराजानेच घेतलेले एक रूप होते. अज्ञातवासाचे वर्ष कुठे काढावे, हा जटिल प्रश्न पांडवांपुढे होता. यमधर्माने प्रत्यक्ष दर्शन देऊन आदेश दिला की, विराट राजाच्या नगरीत अज्ञातवास करा; त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.