Android app on Google Play

 

श्रावण

 


श्रावण पुराण काळात एक शांतनू नावाचा साधू आपल्या पत्नीसोबत राहत होता. दोघेही पती - पत्नी अतिशय वृद्ध आणि आंधळे होते. त्या दोघांना श्रावण नावाचा पुत्र होता. श्रावण आपल्या अंध आणि वृद्ध आई - वडिलांच्या सेवेतच आपले सारे जीवन व्यतीत करत होता. आपल्या माता - पित्याची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत असे. एक दिवस त्याच्या माता - पित्यांनी त्याला सांगितले की, "बाळ, आम्ही आता खूप म्हातारे झालो आहोत, मरण्यापूर्वी आम्हाला भारतातील धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे." श्रवणाने त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्याने आपल्या आई - वडिलांसाठी एक कावड तयार केली आणि त्यात त्यांना बसवून कावड खांद्यावर घेऊन ते तीर्थयात्रेसाठी निघाले. श्रावणाची आपल्या आई - वडिलांवर एवढी श्रद्धा, एवढं प्रेम होतं की त्याला त्यांचे वजन जाणवलेच नाही. कित्येक दिवस ते चालत राहिले. एक दिवस ते एका अशा ठिकाणी पोचले की ज्या जागेवर काहीतरी विपरीत, नकारात्मक जाणीव होत होती. त्या जागेवर येताच श्रवणाने कावड आपल्या खांद्यावरून खाली ठेवली आणि मोठ्याने आपल्या आई - वडिलांवर ओरडला, "किती वेळेची बरबादी चालली आहे ही! मी तरुण आहे आहे माझे आयुष्य तुम्हाला खांद्यावर वाहून नेण्यात व्यर्थ घालवत आहे. मला नाही वाटत की ही गोष्ट बरोबर आहे." श्रावणाच्या वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आली की या जागेत काहीतरी दोष आहे. त्यांनी श्रावणाला सांगितले, "बाळा, इथे नको थांबू, गंगाद्वार (हरिद्वार) इथून जवळच आहे, एकदा आम्हाला तिथे घेऊन चाल, मग तिथे गेल्यावर आपण बोलू." श्रवणाने रागारागानेच कावड उचलून खांद्यावर घेतली आणि तो आपल्या आई - वडिलांना घेऊन हरिद्वार च्या दिशेने चालू लागला. जसा त्यांनी हरिद्वार मध्ये प्रवेश केला, श्रावणाच्या डोळ्यात शरमेने अश्रू आले. त्याने हात जोडून आपल्या आई - वडिलांची क्षमा मागितली आणि म्हणाला, "मला नाही माहित की मला असं काय झालं होतं ज्यामुळे मी तुमच्याशी अशा प्रकारे बोललो. कृपया मला क्षमा करा." यावर श्रावणाचे वडील म्हणाले, "बाळा, यात तुझी काहीच चूक नाही. त्या जागेचा गूणच तसा होता. त्याच्या प्रभावाखाली येऊन तू असं बोललास. म्हणूनच मी तुला गंगाद्वार चलण्यास सांगितले."