Get it on Google Play
Download on the App Store

अहिरावण

अहिरावण हा रावणाचा भाऊ होता आणि तो पाताळ लोकावर राज्य करीत होता. आणि त्याने जादू आणि फसवे भास निर्माण करण्याच्या कलेत नैपुण्य मिळवले होते. जेव्हा इंद्रजिताचा मृत्यू झाला आणि रावणाला आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागला तेव्हा त्याने अहिरावणाला आपल्या मदतीला पाचारण केले. अहिरावणाने रावणाला वचन दिले की तो राम आणि लक्ष्मण यांना जिवंत पकडेल आणि महामाया देवीला त्यांचा बळी चढवेल. बिभीषणाला अहिरावणाच्या या हेतूंविषयी माहिती मिळाली आणि त्याने जाऊन राम आणि लक्ष्मण यांना या गोष्टीची कल्पना दिली आणि हनुमानाला अहिरावणावर नजर ठेवायला सांगण्यात आले. बिभीषणाने हनुमानाला सावध केले की अहिरावण कोणतेही रूप घेऊ शकतो त्यामुळे त्याच्यापासून सावध राहा. अहिरावणाने अनेक वेग - वेगळी रूपे घेऊन राम आणि लक्ष्मणाच्या महालात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु हनुमानाने त्याला प्रत्येक वेळी पकडले. शेवटी त्याने बिभिशणाचे रूप घेतले आणि या वेळी मात्र हनुमानाने त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणून तो राम आणि लक्ष्मणाच्या महालात जाऊ शकला आणि राम आणि लक्ष्मणाला पाताळ लोकात घेऊन जाण्यात यशस्वी ठरला.
जेव्हा हनुमानाला माहिती पडले की अहिरावणाने आपल्याला हातोहात फसवले आहे तेव्हा त्याने बिभीषणाला वाचन दिले की तो राम आणि लक्ष्मण यांना शोधून काढेल आणि अहिरावणाला देखील ठार करेल. हनुमानाने पातळ लोकात जाऊन अहिरावणाचा महाल शोधून काढला. हनुमानाचा सर्वात पहिला सामना मकरध्वज याच्याशी झाला. मकरध्वज हा अर्धा वानर आणि अर्धा मासा होता, त्याचबरोबर नात्याने तो हनुमानाचा पुत्र देखील होता. आपल्या मुलाचा पराभव करून हनुमान जेव्हा अहिरावणाच्या महालात पोचला तेव्हा त्याला समजले की अहिरावणाला मारण्यासाठी पाच वेगवेगळ्या दिशांना असलेले पाच दिवे विझवावे लागतील. या वेळी हनुमानाने पंचमुखी अंजनेयाचे रूप धारण केले.
हनुमानाची चार मुखे म्हणजे तोंडे - हनुमान, वराह, गरुड आणि नरसिंह पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या दिशेला आहेत तर पाचवे मुख हयग्रीव वरच्या दिशेला बघत आहे. या रूपाने हनुमान पाचही दिवे एकाच वेळी विझवू शकला आणि नंतर अहिरावणाला ठार करू शकला.