Android app on Google Play

 

रामाचा वनवास

 जेव्हा रामाला १४ वर्षांचा वनवास झाला तेव्हा संपूर्ण राज्य शोकसागरात बुडून गेले. परंतु श्रीरामांनी पित्याच्या वचनासाठी महालाचा त्याग केला. जेव्हा भरताला या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा तो आपल्या भावाच्या मागे मागे गेला. भरताला पाहून सारे राज्य आपल्या प्रभू रामाला घ्यायला चित्रकुट ला आले. प्रभू रामाने आपला भाऊ आणि आपली प्रजा पाहिली आणि त्यांना सांगितले की तुम्ही दुःख करू नका. मी १४ वर्षांनी तुमच्याकडे परत येईन. मग त्यांनी मोठ्या नम्रपणे सर्वाना उद्देशून सांगितले की 'प्रिय बंधू आणि भगिनींनो, कृपया तुम्ही आपल्या राज्यात परत जा आणि माझी प्रतीक्षा करा.' हे ऐकून सारी प्रजा परत निघून गेली.
१४ वर्षांनंतर जेव्हा प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परतत होते, तेव्हा त्यांनी आपल्या काही प्रजाजनांना चित्रकुट येथे आपली वाट पाहत असलेले पहिले. रामाने त्यांना विचारले की मी तुम्हाला परत जाण्याचा आदेश दिलेला होता तरी तुम्ही गेला का नाहीत? तेव्हा त्यावर त्या लोकांनी उत्तर दिले की प्रभू, तुम्ही तुमच्या बंधू आणि भगिनींना परत जाण्याचा आदेश दिला होता, आम्हाला जायला सांगितले नव्हते. हे सर्वजण तृतीयपंथी होते. त्यामुळे ते बंधू आणि भगिनी यापैकी कोणत्याही समूहात येत नसल्याने इतकी वर्ष ते याच जागी प्रभू रामाची प्रतीक्षा करत होते. यावर रामाला अश्रू अनावर झाले. त्याने त्या प्रजाजनांना आशीर्वाद दिला की जेव्हा कुठे शुभकार्य आणि आनंदाची वेळ असेल, तिथे तृतीयपंथीयांचे स्वागत केले जाईल.