Get it on Google Play
Download on the App Store

परिशिष्ट २ 1

पंचस्कंध, अर्हत्पद व निर्वाण.

पंचस्कंधः-रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या पांच पदार्थांनां पंचस्कंध असें म्हणतात.

पृथ्वी, आप, तेज आणि वायु या चार महाभूतांला आणि त्यांजपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांना रूपस्कंध असें ह्मणतात.

सुखकारक वेदना, दुःखकारक वेदना, आणि उपेक्षा वेदना या तीन प्रकारच्या वेदनांला वेदनास्कंध म्हणतात.

घऱ, झाड, गांव इत्यादि विषयक कल्पनांला संज्ञास्कंध म्हणतात. घर झाड इत्यादि पदार्थ परमार्थतः वर सांगितलेल्या चार महाभूतांचेच बनलेले आहेत; म्हणून ते परस्परांपासून भिन्न नाहींत. असें असतां संज्ञास्कंधाच्या योगें त्यांचा निराळेपणा आमच्या लक्षांत येतो. ही जी पदार्थांना निरनिराळीं नांवें देण्याची मनाची शक्ति, तिलाच संज्ञास्कंध असें म्हणतात.

संस्कार ह्मणजे मानसिक संस्कार. याचे कुशल, अकुशल आणि अव्याकृत असे तीन प्रकार आहेत. दुसर्‍यास मदत करण्याची इच्छा, प्रेम, जागृति इत्यादि संस्कार कुशल जाणावे. लोभ, द्वेष, माया, मत्सर, आळस इत्यादि संस्कार अकुशल जाणावे. अकुशलहि नव्हेत आणि कुशलहि नव्हेत अशा संस्कारांना अव्याकृत ह्मणतात. उदाहरणार्थ, कांहीं पदार्थांची आवड असणें कांहींची नावड असणें इत्यादि संस्कार पूर्वकर्माचे फलभूत असल्यामुळें अकुशल किंवा कुशल यांत त्यांची गणना होत नाहीं. त्यांना अव्याकृत असेंच ह्मटलें पाहिजे.

विज्ञान ह्मणजे जाणणें. संक्षेपानें सांगावयाचे म्हटलें ह्मणजे विज्ञानें सहा आहेत. चक्षुर्विज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राणविज्ञान, जिव्हाविज्ञान, कायविज्ञान व मनोविज्ञान ह्या सहा विज्ञानांच्या समुदायाला विज्ञानस्कंध असें म्हणतात. विज्ञानाला बौद्ध ग्रंथांत चित्त म्हणतात. चित्ताला कधीं कधीं मन हा शब्द लावितात. बौद्धाच्या मतें मन हें अमूर्त आहे. तें अणु प्रमाण नाहीं. म्हणून तर्कसंग्रहादि न्यायग्रंथांत सांगितलेलें मन व बौद्ध ग्रंथांत सांगितलेलें मन हीं एक नव्हेत हें लक्षांत ठेवलें पाहिजे.

हे पांच स्कंध वासनायुक्त असले म्हणजे त्यांस उपादानस्कंध असें म्हणतात. ह्यांच्या योगें पुनर्जन्म होतो. ह्या जन्मीं कुशलाकुशल कर्म केलें म्हणजे त्याच्या जोरावर दुसर्‍या जन्मीं ह्या पांच उपादानस्कंधांचा प्रादुर्भाव होतो. जेव्हां वासनेचा समूळ उच्छेद होतो, तेव्हां या स्कंधांना उपादानस्कंध न म्हाणतां नुसते स्कंध म्हणतात. कारण त्यांच्या योगें पुनर्जन्म होण्याचा संभव नसतो. अर्हत्पद प्राप्त झाल्यावर वासनेचा समूळ उच्छेद होतो. अर्हत्पदाप्रत पावलेल्या व्यक्तींचे पंचस्कंध त्यांच्या मरणापर्यंत राहतात. अकुशल संस्कार मात्र अर्हत्पद मिळाल्याबरोबर सर्वथैव नष्ट होतात. मरण समयीं अर्हतांच्या पंचस्कंधांचा निर्वाणांत लय होतो. अर्थांत त्यांजपासून नूतन पंचस्कंध उदय पावत नाहींत.

अर्हत्पदः- १ सक्कायदिट्ठि (आत्मा हा भिन्न पदार्थ असून तो नित्य आहे अशी दृष्टि), २ विचिकिच्छा (बुद्ध, धर्म आणि संघ यांजविषयीं शंका किंवा अविश्वास), ३ सीलब्बतपरामास (स्त्रानादिव्रतांनींच मुक्ति मिळेल असा विश्वास), ४ कामराग (कामवासना), ५ पटिघ (क्रोध), ६ रूपराग (ब्रह्मलोकदिप्रप्तीची इच्छा), ७ अरूपराग (अरूपदेवलोकप्राप्तीची इच्छा), ८ मान (अहंकार), ९ उद्धच्च (भ्रांतचित्तता) आणि १० अविज्जा (अविद्या) ह्या दहा पदार्थांना संयोजनें (बंधनें) म्हणतात. आर्य अष्टांगिक मार्गाच्या अभ्यासानें ह्या दहा संयोजनांचा नाश झाला म्हणजे अर्हत्पद प्राप्त होतें. अर्हत्पद प्राप्त झालें म्हणजे निर्वाणाचा पूर्णपणें साक्षात्कार होतो.

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1 बुद्ध व बुद्धधर्म 2 बुद्ध 1 बुद्ध 2 बुद्ध 3 बुद्ध 4 बुद्ध 5 बुद्ध 6 बुद्ध 7 बुद्ध 8 बुद्ध 9 बुद्ध 10 बुद्ध 11 बुद्ध 12 बुद्ध 13 धर्म 1 धर्म 2 धर्म 3 धर्म 4 धर्म 5 धर्म 6 धर्म 7 धर्म 8 धर्म 9 धर्म 10 धर्म 11 धर्म 12 धर्म 13 धर्म 14 धर्म 15 धर्म 16 संघ भाग १ला 1 संघ भाग १ला 2 संघ भाग १ला 3 संघ भाग १ला 4 संघ भाग १ला 5 संघ भाग १ला 6 संघ भाग १ला 7 संघ भाग १ला 8 संघ भाग १ला 9 संघ भाग १ला 10 संघ भाग १ला 11 संघ भाग १ला 12 संघ भाग १ला 13 संघ भाग २ रा 1 संघ भाग २ रा 2 संघ भाग २ रा 3 संघ भाग २ रा 4 संघ भाग २ रा 5 संघ भाग २ रा 6 परिशिष्ट १ 1 परिशिष्ट १ 2 परिशिष्ट १ 3 परिशिष्ट १ 4 परिशिष्ट २ 1 परिशिष्ट २ 2 परिशिष्ट ३ 1 परिशिष्ट ३ 2 परिशिष्ट ३ 3 परिशिष्ट ४ 1 परिशिष्ट ४ 2