Get it on Google Play
Download on the App Store

धर्म 5

कायावाचामनें दाहा पापांचा त्याग करणें; ही निषिद्धशीलांत मुख्य गोष्ट आहे. या दाहा पापांला पाली भाषेंत दस अनुसल कम्मपथ असें ह्मणतात. ती हीं:-

(१) प्राणघात (२) अदत्तादान (३) व्यभिचार हीं तीन कयिक पापें होत. (१) असत्यभाषण (२) चहाडी (३) कठोर भाषण व (४) व्यर्थ बडबड हीं चार वाचिक पापें होत.(१) परद्रव्यासक्ति (२) क्रोध व (३) नास्तिकता, ही तीन मानसिक पापें होत.

येथें नास्तिकता ह्मणजे परोपकार करण्यांत कांही अर्थ नाहीं, शील पालन करण्यांत अर्थ नाहीं, समाधि पासून कांही लाभ नाहीं इत्यादि विचार. बाकी अर्थ स्पष्ट आहे. ज्याला  आपलें शील पूर्णत्वाला न्यावयाचें असेल त्यानें या दहा पापांचा त्याग अवश्य केला पाहिजे. या दहा पापांचा मनुस्मृतीच्या १२ व्या अध्यायांतहि उल्लेख सांपडतो तो येणें प्रमाणें:-

परद्रव्येष्वभिध्यानं मनसानिष्टचिंतनम् ।
वितथाभिनिवेशश्च त्रिविधं कर्म मानसम्।।


परद्रव्याचें चिंतन करणें, दुसर्‍याचें वाईट चिंतणें आणि भलत्याच मार्गाला लागणें (नास्तिकता) हीं तीन मानसिक (पाप) कर्में जाणावीं.

पारूष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वश:।
असंबद्धप्रलपश्च वाङ्मयं स्याच्चतुर्विधम्।।


कठोर भाषण, असत्य भाषण, सर्व प्रकारची चहाडी, आणि वृथा बडबड, हीं चार वाचिक (पाप) कर्में होत.

अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानत:।
परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्तृतम्।।

आदत्तादान(चोरी), वेदविहित नसलेली हिंसा, व परदारा गमन, हीं तीन कायिक पापकर्में होत.

मनूनें येथें वेदाला विहित असलेली हिंसा हें पाप नव्हे असें ह्मटलें आहे. असा भेद करणें बौद्धांस पसंत होणार नाहीं. हिंसा ह्मटली ह्मणजे ती वेदविहित असो वा नसो, येथून तेथून सर्व सारखी आहे असें बौद्धांचे ह्मणणें. एवढा मतभेद बाजूस ठेवला तर आद्य स्मृतिकारांनी बौद्धमत जसेंच्या तसें उचलेलें आहे असें दिसून येईल१.  आजकाल वेदविहित अशी हिंसा फारच क्वचित् घडते. पांचपंचवीस वर्षांतून एकदा यज्ञ झाला तर होतो. कालिपूजा, दसरा इत्यादि प्रसंगीं होणार्‍या बलिदानास वेदविहित असें ह्मणतां येणार नाहीं. तेव्हां वरील दहा पापांचा पूर्णपणें त्याग करण्याचा एकाद्या कर्मठ हिंदुगृहस्थानें निश्चय केला असतां स्मृतीग्रंथ त्याच्या आड येणार नाहींत, इतकेंच नव्हे तर वर दिलेल्या मनुस्मृतींतील उतार्‍यात त्याला बळकट पाठिंबा मिळेल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- मनुस्मृति इ० स० च्या चवथ्या शतकांत लिहिली असावी असें आलिकडील पंडितांनीं ठरविलें आहे. डा० भांडारकरांचा A Peep in to Early History of India, ( Page 46 ) ह निबंध पहावा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1 बुद्ध व बुद्धधर्म 2 बुद्ध 1 बुद्ध 2 बुद्ध 3 बुद्ध 4 बुद्ध 5 बुद्ध 6 बुद्ध 7 बुद्ध 8 बुद्ध 9 बुद्ध 10 बुद्ध 11 बुद्ध 12 बुद्ध 13 धर्म 1 धर्म 2 धर्म 3 धर्म 4 धर्म 5 धर्म 6 धर्म 7 धर्म 8 धर्म 9 धर्म 10 धर्म 11 धर्म 12 धर्म 13 धर्म 14 धर्म 15 धर्म 16 संघ भाग १ला 1 संघ भाग १ला 2 संघ भाग १ला 3 संघ भाग १ला 4 संघ भाग १ला 5 संघ भाग १ला 6 संघ भाग १ला 7 संघ भाग १ला 8 संघ भाग १ला 9 संघ भाग १ला 10 संघ भाग १ला 11 संघ भाग १ला 12 संघ भाग १ला 13 संघ भाग २ रा 1 संघ भाग २ रा 2 संघ भाग २ रा 3 संघ भाग २ रा 4 संघ भाग २ रा 5 संघ भाग २ रा 6 परिशिष्ट १ 1 परिशिष्ट १ 2 परिशिष्ट १ 3 परिशिष्ट १ 4 परिशिष्ट २ 1 परिशिष्ट २ 2 परिशिष्ट ३ 1 परिशिष्ट ३ 2 परिशिष्ट ३ 3 परिशिष्ट ४ 1 परिशिष्ट ४ 2