Get it on Google Play
Download on the App Store

बुद्ध 3

आतां ह्या गोष्टींस त्रिपितकांचा कांही आधार सांपडतो कीं काय तें पाहूं. बोधिसत्वाला राहण्यासाठीं तीन राजवाडे होते याला सुत्तपिटकांतील अंगुत्तरनिकायांत आधार सांपडतो. आपल्या पूर्व स्थितींतील गोष्ट सांगत असतां भिक्षूंला उद्देशून बुद्ध भगवान् ह्मणतात:-

“भिक्षू हो, मी फार सुकुमार होतों; माझ्या सुखासाठीं माझ्या पित्यानें तलाव खणून त्यांत नाना जातींच्या कमलिणी लावल्या होत्या. माझीं वस्त्रें प्रावरणें रेशमीं असत. शीतोष्णाची बाधा न व्हावी ह्मणून बाहेर निघालें असतां माझ्यावर माझे नोकर श्वेतछत्र धरीत असत. हिवाळ्यासाठीं, उन्हाळ्यासाठीं व पापसाळ्यासाठीं  माझे निरनिराळे तीन प्रासाद होते. जेव्हां मी पावसाळ्यासाठीं बांधलेल्या महालांत राहण्यास जात असें तेव्हां चार महिने बाहेर न पडतां स्त्रियांच्या गीतानें आणि वाद्यानें कालक्रमण करीत असें. इतरांच्या घरीं दासांला आणि नोकरांना निकृष्ट प्रतीचें अन्न देतात; पण माझ्या घरीं माझ्या दासदासींना मिळणारें अन्न ह्मटलें ह्मणजे मांसमिश्रित उत्तम भात.

“अशा संपत्तीचा उपभोग घेत असतां माझ्या मनांत असा विचार आला कीं, अविद्वान् सामान्य जन स्वत: जरेच्या तडाक्यांत सांपडणार असून जराग्रस्त ह्मातार्‍या मनुष्याकडे पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करितो। परंतु मी स्वत:जरेच्या तडाक्यांत सांपडलों असून मनुष्याप्रमाणें जराग्रस्त मनुष्याला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला, तर तें मला शोभणार नाहीं, ह्या विचारानें माझा तारूण्यमद् समूळ नाहींसा झाला.

“अविद्वान् सामान्य जन स्वत: व्याधींच्या जबडयांत सांपडणार असून व्याधिग्रस्त मनुष्याकडे पाहून कंटाळतो व तो त्याचा तिरस्कार करितो, परंतु मी स्वंत: व्याधीच्या तडाक्यांतून सुटलों नसतां त्या सामान्य जनाप्रमाणें व्याधिग्रस्ताला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचारानें माझा आरोग्यमद् समूळ नष्ट झाला.

अविद्वान् सामान्य जन स्वत: मरणधर्मी असून मृत शरीराकडे पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करितो। परंतु मी स्वत: मरणधर्मी असून त्या सामान्य जनाप्रमाणें मृताला कंटाळलों किंवा त्याच्या शरीराचा तिरस्कार केला तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचारानें माझ्या जीवितमद समूळ गळून गेला.”

(अंगुत्तरतिकाय, निकनिपात.)

ह्या उतार्‍यावरून आपणांस असें दिसून येईल कीं, बोधिसत्वाच्या राहण्यासाठीं जरी तीन प्रासाद होते तरी शुध्दोदन राजानें त्यास त्यांत कोंडलें नव्हतें; किंवा तो गृहत्याग करील या भीतीनें त्यावर नृत्यांगनांचा खडा पहारा ठेवला नव्हता. सध्यांच्या एकाद्या संस्थानिकाच्या मुलाप्रमाणें सर्व प्रकाराचीं करणमुकीचीं साधनें त्याला अनुकूल होतीं, तरी त्याचें समाधान झालें नाहीं. जराव्याधीमरणांच्या उग्र स्वरूपांची कल्पना उत्तरोत्तर त्याच्चा मनांत दृढ होत गेली आणि त्याचा तारुण्य, आरोग्य व जीवित यांचा मद नाहींसा झाला.

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1 बुद्ध व बुद्धधर्म 2 बुद्ध 1 बुद्ध 2 बुद्ध 3 बुद्ध 4 बुद्ध 5 बुद्ध 6 बुद्ध 7 बुद्ध 8 बुद्ध 9 बुद्ध 10 बुद्ध 11 बुद्ध 12 बुद्ध 13 धर्म 1 धर्म 2 धर्म 3 धर्म 4 धर्म 5 धर्म 6 धर्म 7 धर्म 8 धर्म 9 धर्म 10 धर्म 11 धर्म 12 धर्म 13 धर्म 14 धर्म 15 धर्म 16 संघ भाग १ला 1 संघ भाग १ला 2 संघ भाग १ला 3 संघ भाग १ला 4 संघ भाग १ला 5 संघ भाग १ला 6 संघ भाग १ला 7 संघ भाग १ला 8 संघ भाग १ला 9 संघ भाग १ला 10 संघ भाग १ला 11 संघ भाग १ला 12 संघ भाग १ला 13 संघ भाग २ रा 1 संघ भाग २ रा 2 संघ भाग २ रा 3 संघ भाग २ रा 4 संघ भाग २ रा 5 संघ भाग २ रा 6 परिशिष्ट १ 1 परिशिष्ट १ 2 परिशिष्ट १ 3 परिशिष्ट १ 4 परिशिष्ट २ 1 परिशिष्ट २ 2 परिशिष्ट ३ 1 परिशिष्ट ३ 2 परिशिष्ट ३ 3 परिशिष्ट ४ 1 परिशिष्ट ४ 2