वंध्यत्व
वंध्यत्व हा पुनरुत्पादक यंत्रणेचा रोग असून त्यामुळे शरीराचं सर्वात मूलभूत कार्य – मूल जन्माला घालणं – हरवून बसतं. गर्भधारणा होणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असून ती अनेक घटकांवर अवलंबून असते. पुरुषाव्दारे सुदृढ शुक्रजंतू तयार होणं आणि स्त्रीव्दारे सुदृढ अंडं तयार होणं, अंडवाहक नलिका मोकळ्या असणं म्हणजे शुक्रजंतू अंड्यापर्यंत पोचेल, दोघांचं मिलन झाल्यानंतर अंडं फलित करण्याची शुक्रजंतुची क्षमता, फलित अंडं त्या महिलेच्या गर्भाशयात स्थापित केलं जाण्याची त्याची क्षमता आणि गर्भाची आवश्यक गुणवत्ता हे ते घटक आहेत.
अंततः, गर्भधारणा पूर्ण काळाची होण्यासाठी, गर्भ सुदृढ असावा आणि त्याच्या विकासासाठी त्या महिलेच्या शरीरातील हार्मोनल स्थिती पुरेशी असावी. यापैकी एखादा घटक जेव्हा बिघडलेला असेल तेव्हा वंध्यत्व येऊ शकतं.
वंध्यत्वावर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. वंध्यत्वावरील उपचार पद्धतींमध्येही अनेक प्रकार आहेत. त्यात जननक्षमता प्राप्त करण्याच्या या प्रवासामध्ये अनेक टप्पे येतात. जसे की संप्रेरकांचे परीक्षण, एन्डोस्कोपी, फॉलिक्युलर मॉनिटरींग, अंडाशयास उत्तेजित करणे आणि आययुआय यासारख्या विविध प्रक्रियांचा समावेश आहे. त्याच बरोबर आयव्हीएफ उपचार पद्धतीचा प्रामुख्याने विचार केला जात आहे.