सीमोल्लंघन 4
आणि हा कोण येतो आहे बोलावयाला? हा रुपल्या. तो उभा राहिला. परंतु त्याला बोलवेना. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. तो म्हणाला, “सखारामभाऊ-घनाभाऊ यांच्यासारखी माणसे कोठे दिसणार? आज ना उद्या, मीही त्यांच्या वसाहतीत जाईन. माझा बाप गणा सध्या आजारी आहे. मी जाऊ शकत नाही. हा हार घनाभाऊंच्या गळ्यात घालतो. संस्कृति-मंदिरात ते होते तर मला आपल्या पानाजवळ जेवायला वाढायचे. त्यांना गर्व नाही. सारी माणसे त्यांना सारखी वाटतात.” असे म्हणून रुपल्या त्यांच्या पाया पडला. सारी सभा सद्गदित झाली.
घना शेवटी म्हणाला, “मी तुमचे प्रेम घेऊन जातो. काही वर्षे आयुष्यातील येथे जायची होती. मी कामगारबंधूंना एवढेच सांगीन की, त्यांनी काही झाले तरी अत्याचाराची कास धरू नये. आपल्या देशात शांततेच्या मार्गाने समाजवाद येईल, अशी मला आशा आहे. थोडा वेळ लागेल; -- लागू दे. परंतु रक्तपाताचे जवळचे वाटले तरी ते मार्ग नकोत. विद्यार्थ्यांना सांगेन की त्यांनी मिळणारे ज्ञान सेवेसाठी द्यावे. या राष्ट्रला निरनिराळ्या शास्त्रांतील तज्ज्ञांची जरूर आहे. परंतु शिकून फार पगाराची अपेक्षा नका धरू. नाना शास्त्रांत प्रवीण होऊन सेवेसाठी पुढे या. काही करून दाखवा. प्रयोग करा, नागरिकांना सांगेन की ख-या अर्थाने नागरिक व्हा. दुस-याचा विचार करीत जा. सहकारी भावना ठेवा. स्वच्छता-धर्म जीवनात आणा. तुमच्या गावची प्रतिष्ठा तुम्ही कसे वागता यावर आहे. नाव सुंदरपूर, -- परंतु ठायी ठायी उकिरडे असतील तर? तेथील जनतेच्या सुंदर जीनवावे गाव सुंदरपूर होवो. मी दूर जात असलो तर तुमचे प्रेम मला तारील, स्फूर्ती देईल.”
सभा संपली; रात्री घना किती तरी वेळ मित्रांजवळ बोलत होता. दुस-या दिवशा सकाळी दहा वाजता ती खास गाडी सुटणार होती.
उजाडताच घना रुपल्याच्या वडलांना भेटून आला. गणा अंथरुणावर होता. घनाने त्याचा निरोप घेतला. नंतर संस्कृतिमंदिरातील मित्रांना भेटला तो सुंदरदासांनाही भेटायला गेला. सर्वांना आश्चर्य वाटले!
“तुम्ही भेटायला आलात?” त्यांनी विचारले.