घनाचा आजार ! 16
“तुमच्या दगडाला जणू पंख फुटले होते. तुमच्या हातात अजब शक्ती दिसते. आता मी फेकते हा दगड.” असे म्हणून मालतीने दगड फेकला. परंतु तो एकदम पाण्यात गेला. तो उड्या मारीत गेला नाही. सखारामच्याने आता राहावले नाही. तोही खेळात सामील झाला. तिघे खेळात रमली. घनाचे दगड नुसते पाण्याला स्पर्श करून उड्या मारीत जात. मालतीला कौतुक वाटे.
“रामनामाने शिळा तरत. तुम्ही का मनात रामनाम म्हणता?” तिने विचारले.
“लोकांची सेवा हे माझे रामनाम. जपजाप्य माझ्याजवळ नाही.” तो म्हणाला.
“तुम्ही देवबीव नाही मानीत” तुम्ही का नास्तिक आहात?” तिने हसत विचारले.
“नास्तिक म्हणजे काय? हे जग मांगल्याकडे चालले आहे असे मी मानतो. ही आशा ज्याच्याजवळ आहे- तो आस्तिक नव्हे का? देव आकाशात कोठेतरी आहे असे मानून या जगात प्रत्यक्ष वागताना जो वाटेल तसा वागतो, त्याच्यापेक्षा जगाच्या मांगल्यावर श्रद्धा राखून ते मांगल्य मानवी जीवनात यावे म्हणून जो धडपडतो तोच खरा आस्तिक, असे नाही तुम्ही म्हणणार? सखाराम तुला काय वाटते?”
“ईश्वराला न मानणारे नास्तिक पुष्कळ वेळ महान संतांप्रमाणे वागताना दिसतात, तर माळा ओढणारे दांभिक बगळे असतात.” तो म्हणाला.
मालती सायंकालीन आकाशाकडे बघत होती. तेथे जसे शतरंग फुलले होते. ती एकाएकी मुकी झाली. तेथील एका शिलाखंडावर ती बसली. सखाराम व घनाही तेथे बसले. सृष्टीला बघता बघता जणू समाधी लागली.
“चल भाऊ. उशीर झाला. मला स्वयंपाक करायचा आहे. वैनी असती तर तिच्या हातचा स्वयंपाक हे जेवते.” मालती म्हणाली.
“घना, आमची वैनी म्हणजे देवमाणूस. कधी आदळआपट नाही. द्वेष-मत्सर नाही. मालती घरात काम करू लागली की वैनी तिला म्हणते, ‘वन्स, तुम्ही कशाला करता काम? उद्या सासरी गेल्यावर आहेच काम.’ खरेच, दादा नि वैनीचा जोडा म्हणजे राम-सीतेचा जोडा.” सखाराम म्हणाला.
“तुम्ही कधी जाणार सासरी?” घनाने विचारले.
“लग्न झाल्याशिवाय कशी जाऊ?” तिने हसत उत्तर दिले.