संपाची तयारी 11
मग तो म्हणाला, “अशा प्रकारचा धर्म असेल तर त्यावर कोण टीका करील? परंतु धर्म धर्म म्हणणारे समाजातील अन्याय दूर करायला कधी पुढे येत नाहीत. आम्ही कदाचित अंघोळ करत नसू. कदाचित सिगारेट ओढत असू. परंतु आम्ही दुस-याचा संसार सुखाचा व्हावा म्हणून प्राण फेकायला तयार असतो. दुस-यासाठी काही न करणारा, परंतु आंघोळ करणारा तो धार्मिक, की आंघोळ लवकर न करणारा, परंतु परार्थ प्राणार्पण करणारा अधिक धार्मिक? त्या धर्माला आम्ही अफू म्हणतो की जो अन्याय सहन करायला शिकवतो; समाजातील विषमता मंगळ-शनीवर ढकलतो. कामगार आजारी पडून क्षयाने मेला तर त्याला का आकाशातील शनीची साडेसाती होती? मालकाने पगारी रजा दिली असती, नीट पुरेशी मजुरी दिली असती तर तो कामगार मरता का? मालक तिकडे कामगारांच्या घामातून पैदा होणा-या संपत्तीतून मंदिरे बांधतो. त्यांवर सोन्याचे कळस चढवतो. देवाच्या मूर्तीला लाखो रुपयांचे दागिने करतो; परंतु इकडे कामगार, त्याच्या बायका, त्याची ती मुलेही उपाशी मरत असतात! या दरिद्रीनारायणांची सेवा म्हणजे का धर्म नाही? तिकडे मंदिर बांधण्याऐवजी इकडे घरे बांधून दिलीत तर का ते धर्म कर्म होणार नाही? गाढवालाही पाजलेली गंगा जर प्रभूला पोचते तर ता श्रमजीवी मानवांची केलेली सेवा का देवाला नाही पोचणार? आम्हांला टिळेमाळांचे धर्म नको आहेत. शनी-मंगळचे रडके धर्म नको आहेत. तू गरीब का, तर तुझे प्राक्तन! असे शिकवणारे धर्म नको आहेत. मी श्रमतो. मी का उपाशी? श्रमणा-यांची प्रतिष्ठा स्थापणे हा धर्म. वेदात म्हटले आहे:
न ऋते श्रान्तस्य सख्याय देवा:।
जो दमलेला नाही त्याची मैत्री देवदेखील इच्छित नाही. लफंग्या धर्मांवर आम्ही टीका करतो. समाजातील विषमता बघून ती दूर करण्यासाठी न उठता जेठे मारून खाल्ल्या पोटी चर्चा करणारे धर्ममार्तंड ते का धार्मिक? तुकाराम महाराज म्हणतात :
तुका म्हणे व्हावी प्राणांसवे ताटी।
नाही तरी गोष्टी बोलू नये
धर्म म्हणजे परम ध्येयासाठी स्वत:च्या प्राणांची ताटातूट करण्यासही तयार असणे. धर्म म्हणजे सर्वांच्या धारणेचा विचार. तो खरा धर्म. तो मानवतेचा धर्म आमच्याजवळ आहे. बाकीच्या धर्मांचा काय उपयोग? तुमची गीता म्हणते—
सोडूनि सगळे धर्म एका शरण ये मज।