घनाचा आजार ! 18
“मालती, तुझा मला बोजा नाही. तू काळजी नको करून. तुझ्यासाठी आम्ही खटपट करीत नाही असे का तुला वाटते? अशी वैतागाची भाषा नको बोलूस.” दादा म्हणाला.
“परंतु आधी जेवायला चला.” ती म्हणाली.
“घना, अरे घना-” सखारामने हाक मारली, डोळे चोळीत तो उठला.
“सुंदर स्वप्न पाहात होतो, कशाला उठवलेस?” तो म्हणाला.
“आधी पोटात जाऊ दे; मग भरपूर स्वप्ने बघत झोप.” सखाराम प्रेमाने बोलला.
जेवण-खाण झाले, आणि खरखरच घना लवकर झोपी गेला. तो आज थकून गेला होता.
आठ दिवस हा हा म्हणत गेले. आज घना परत जाणार होता. आज जेवायला शिकरण केली होती. तीच मेजवानी.
“पोटभर जेवा.” मालती म्हणाली.
“आज शिकरणशी केलीत?” त्याने विचारले.
“लग्नाचे हे केळवण!” दादा म्हणाला.
“ठरले वाटते कुठे लग्न?” त्याने सरळ विचारले.
“दादाला माहीत.” सखाराम म्हणाला.
घनाची बांधाबांध झाली. मालतीने पटकन एक डबा आणला.
“हा घ्या बरोबर.” ती म्हणाली
“कशाला ओझे?”
“वाटेत कमी करा. आणि तिकडे तुम्ही एकटे. कोण आहे गोडधोड द्यायला? तुम्ही जगाची काळजी घेता, तुमची कोण घेणार? आम्ही सामान्य माणसे. तुमच्यासारख्यांची थोडी सेवा हातून घडली तरी ती केवढी कृतार्थता! खरेच.” ती काप-या आवाजात म्हणाली.
“मालती, तुम्ही सर्व सुखी असा.” तो म्हणाला.
सर्वांचा निरोप घेऊन तो गेला. आगगाडीत बसल्यावर त्याच्या विचारांची गाडी भरघाव सुटली होती.