संपाची तयारी 13
घनाचे भाषण सारी जनता ऐकत होती. प्रचंडच होती ती सभा. ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या ओव्या, अभंग घेऊन तो सांगत होता. त्यांना ते समजत होते. त्यांना ते अनोळखी विदेशी भारूड नाही वाटले; आणि “सुंदरपूरला संप झाला तर तुम्ही कामगारांना सहानुभूती दाखवणार की नाही? आपल्या भावाच्या तोंडातील भाकर काढून घेण्यासाठी तुम्ही नाही ना गिरणीत भरती होणार? बोला. कामगारांबद्दल सहानुभूती असेल तर हात वर करा.” असे त्याने म्हणताच हजारो हात वर झाले. शेकडो मायभगिनींनी हात वर केले.
घनाला आनंद झाला. राष्ट्रगीत होऊन सभा संपली. लोक घरोघर गेले, गावोगाव गेले. घनाची मोटार दुस-या गावाला गेली. असा प्रचार झाला.
त्या दिवशी सुंदरपूरला प्रचंड सभा झाली. आधी गावभर पलित्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. घोषणा होत होत्या. जयजयकार होत होते. ‘पगारवाढ ताबडतोब!’ हा आवाज सर्वत्र घुमत होता. प्रचारामुळे सभेला तुफान गर्दी झाली होती. वातावरण प्रक्षुब्ध होते. हे जागृत कामगार काय करतील कोणाला ठाऊक, असे सर्वांना वाटत होते. परंतु सर्वत्र शांती होती. आज सभेत पंढरीने एक सुंदर गाणे म्हटले:
समाजवादी आम्ही आहो वैषम्याचे वैरी
वैषम्याचे जहर झोंबतो अमुच्या या जिव्हारी
मानव्याचे अम्ही पुजारी मानवतेचे भक्त
मानवतेच्या महिम्यासाठी सांडू अपुले रक्त
धनधान्याचा कोण विधाता कोण तयांचा स्वामी
श्रमणा-यांचा आधी त्यावर हक्क, गर्जतो आम्ही
खरा धर्म हा, खरा न्याय हा, यास्तव आम्ही लढतो
यास्तव आम्ही लढता लढता प्राणहि अपुले देतो
सकळांचे संसार सुखाचे करणे, अमुचा धर्म
या धर्मास्तव निशिदिनि अमुचे चाले संतत कर्म
श्रमणा-यांना सुखी कराया अमुचे हे उद्योग
गीतेमधला आचरीतसो उदात्त गंभिर योग
भारतात या मोकळेपणे समाजवादी रचना
आज ना उद्या आणुच ऐशा मनी पूजितो स्वप्ना
या बंधूंनो, या भगिनांनो, करावया सहकार
उदात्त ध्येया, उदात्त धर्मा, करावया साकार
जीवनास या जाचक बोचक तोडु बंधने सारी
सौख्याचे माहेर करू ही भारतभूमी प्यारी
समाजवादी आम्ही आहो वैषम्याचे वैरी
वैषम्याचे जहर झोंबतो अमुच्या या जिव्हारी