इंदूरकडे प्रस्थान 11
“देवाची इच्छा, तसे होईल.” ती म्हणाली.
“मानवाची इच्छा म्हणू.” घना म्हणाला.
“परंतु तो देव का तुझ्या-माझ्यात, या सर्वांत नाही? त्या परब्रह्माच्या विकासातील एक टप्पा म्हणजे मानव! कधी काळी ब्रह्म पूर्ण होते असे नव्हे. ती एक कल्पना आहे. तुमच्याआमच्या द्वारा ती मूर्त होत आहे. विश्वाचे लक्ष कोटी पाकळ्यांचे कमळ एकेक पाकळी उघडीत आहे.”
“तुम्ही सुरेख बोलता.” ती म्हणाली.
“तुम्ही सुरेख काम करता.” तो म्हणाला.
“आणि तुम्ही नाही वाटते करीत? भाऊ येथून घरी आला, परंतु तुम्ही येथे सेवा आरंभलीत.”
“मला कर्म म्हणजे संकुचितपणा वाटतो. कर्म म्हणजे अनंत विचारांतून खाली येणे. कर्म म्हणजे बंधन, मर्यादा. मला विचाराच्या स्वच्छ आकाशात रमणे आवडते. मी या पसा-यात गुदमरतो.” सखाराम म्हणाला.
“परंतु विचारावर जगता येत नाही.” घना हसून म्हणाला.
“मी झाडाचा पाला खाईन. झ-याचे पाणी पिईन. संस्कृती म्हणजे जीवनात पाचपन्नास पदार्थ असणे असे तुम्हांला वाटते; मला तसे वाटत नाही. सिनेमा, रेडिओ, चॉकलेट, म्हणजे का संस्कृती? शतबंधनातून तुम्ही मुक्त किती झालात, यावर तुमची संस्कृती अवलंबून. रेडिओची सवय झालेली मनुष्य रेडिओ बिघडला तर बेचैन होतो. त्याचा आनंद त्या वस्तूवर अवलंबून. शेकडो वस्तूंचे तुम्ही गुलाम! तुम्हांला स्वातंत्र्याचा अर्थच कळत नाही. सद-याला गुंडी नसेल तर बाहेर जायची लाज वाटते. ती गुंडी म्हणजे का माझ्या जीवनाची उंची? विवेकानंद कधी बंडी घालीत, कधी साहेबी पोशाख करीत. म्हणत कपड्यांची गुलामगिरी नको. मी वाटेल तो पोशाख करीन, अमुकच करा हे बंधन कशाला? सुख म्हणजे वस्तूंची यादी नव्हे. सुख विवेकाने प्राप्त होत असते.”
सखारामच्या बोलण्याकडे दोघे लक्षपूर्वक ध्यान देत होती. तो जणू संस्फूर्त होऊन बोलत होता.