संपाची तयारी 6
प्रदर्शन फारच यशस्वी झाले. गावात शिकण्याची एक लाट आली. प्रत्येक आळीत साक्षरतेचा वर्ग सुरू झाला. स्वयंसेवक मिळाले. काही शिक्षकांनीही हे काम अंगावर घेतले.
पुस्तके व इतर सामान यासाठी पैसे हवेत. सर्वांनी एक नाटक करायचे ठरविले. घनाने एक सुंदर नाटक लिहिले. अजून सुट्टी होती. नाटकाची तालीम सुरू झाली. घनाही काम करणार होता. गोपाळ व मोती यांचे काम उत्कृष्ट होई. नाटक करण्याचा दिवस ठरला. तिकिटविक्री जोरदार झाली. प्रयोग अपूर्व झाला. गोपाळच्या गाण्यांना वन्समोर मिळाला. साक्षरतेच्या कामाला पैसे मिळाले. घनाने मध्यंतरात सर्वांचे आभार मानले. प्रक्षकांनी देणग्या दिल्या. गोपाळ व मोती यांना कोणी बक्षिसे दिली.
“ही बक्षिसे आम्हांला नकोत. ती साक्षरतेच्या कामी उपयोगी पडतील.” ते तरुण म्हणाले.
अशा प्रकारे सुंदरपुरात सेवेचे सौंदर्य येत होते. स्वच्छता, ज्ञान, सहकार्य, यांचा प्रकाश येत होता. मुलामुलींना बरोबर घेऊन घना ही कामे करी परंतु त्याचा बराचसा वेळ कामगारांच्या संघटनेत जाई. युनियनचे आता बरेच सभासद झाले होते. कामगारांत नवा प्राण आला होता. मधून मधून घना सभा घेई. बाहेरचे व्याख्याते बोलवी. काही हुषार कामगारांचे अभ्यासवर्ग तो घेई. कामगार-चळवळी निरनिराळ्या देशांत कशा झाल्या, ते तो समजावून सांगे. त्याने त्यांच्यासाठी वाचनालय सुरू केले होते. थोडीफार पुस्तकेही तेथे होती.
त्या दिवशी घना नि काही कामगार-कार्यकर्ते बोलत हेते.
“आपण नुसत्या चर्चा किती दिवस करणार? आता प्रत्यक्ष पाऊल टाकण्याची वेळ नाही का आली? कामगारांची येथील मजुरी किती कमी आहे. इतर ठिकाणी पगारवाढ झाली. येथे कशाला पत्ता नाही. येथील बातमीही कुठल्या वर्तमानपत्रात येत नाही. वर्तमानपत्रांत येईल असा आवाज आपण उठवला पाहिजे.” गंभीर म्हणाला.
“विचार करुनच पाऊल टाकायला हवे. उठलेला आवाज पुन्हा बंद नाही पडता कामा.” पंढरी म्हणाला.