जा, घना जा ! 4
“चला जेवायला.”
“चला.” सखाराम म्हणाला.
तेथे दहा-बारा जण जेवायला असत. एक आचारी होता. इतर काम करायला एक वृद्ध गडी होता. त्याचे नाव गणा. गणाचा एक मुलगा गिरणीत कामाला जाई. लहान दहा वर्षांचा रुपल्या अजून कामाला नसे जात. म्हाता-या गणाचा रुपल्यावर फार जीव. रुपल्याही त्या क्लबचेच काम करी. उरले-सुरले अन्न गणा नि रुपल्या यांना पुरे.
“बसा, सखाराम.” घना म्हणाला.
दोघे शेवटी जवळ जवळ जेवायला बसले. त्या जेवणा-या मंडळीत कोणी बंगाली होते, कोणी गुजराती होते, एक तमिळ होता, काही महाराष्ट्रीय होते, एक कन्नड बंधूही होता. जणू ते भारतीय संमेलन होते!
“नूतन बंधूर नाम की!” बंगाली बाबूने विचारले.
“नामटी एकटु सखाराम.” सखाराम हसत म्हणाला.
“बंगाली जानते पोरा?”
“किछु किछु!”
सर्वांना हसू आले. सखारामला एकदम ठसका लागला. त्याला का अळसुद गेले?
“पाणी प्या, पाणी प्या.” कोणी म्हणाले.
“तन्नी कुडी.” तमिळ मित्र म्हणाला.
“कुडच्याची.” पाणी पिऊन सखाराम म्हणाला.
“आप ते हर एक प्रान्तकी भाषा जानते हैं ऐसे मालून पडता है।” एक उत्तर भारतीय म्हणाले.
“मैं तो भारतका यात्री आज इतने दिन घूमता हूँ। आल्मोडासे कन्याकुमारी तक घूमा। आज यहाँ आया हूँ। मैं शन्तिसमाधान ढूँडता हूँ।” सखाराम म्हणाला.
“समाधान बाहर कहीं नहीं मिलता, समाधान मनका एक धर्म है, मनकी वृत्ती है। विवेकबुद्धीसे समाधान मिलता है। इधर उधर मिलनेवाली यह चीज नहीं है।”
“तो भी स्थानमहात्म्यका असर होता है। सत्संगका परिणाम होता है। वह मै देखूंगा।” सखाराम म्हणाला.
जेवणे झाली. सखाराम आपल्या खोलीत गेला. “तुम्हाला लवंग हवी?” घनाने येऊन विचारले.
“नको.”