मालतीचे आगमन 4
घना बाबूला म्हणाला: “बाबू, तुला एक महत्त्वाचे काम मी सांगणार आहे. तू इंदूरला जायचे. अमरनाथ म्हणून तेथे शेतकीखात्याचे प्रमुख आहेत. त्यांनीच मागे जाहिरात दिली होती की, कोणाला वसाहत वसवायची असेल तर त्यांनी यावे. इंदूर सरकार त्यांना सारे सहाय्य करील. अमरनाथ माझा मित्र आहे. मी पूर्वी इंदूरच्या कृलेजात शिकत असताना तो तेथे होता. तो पुढे होता. शेतकी कॉलेजातील पदवी त्याने घेतली आहे. अनेक योजना त्याच्या मनात असतात. मी पत्र देईन ते तू त्यांना नेऊन दे. उत्तर घेऊन ये. मी तुरुंगात असलो तर सखारामजवळ दे. लॉकपमध्ये मला भेटता आले तर तेथे येऊन सांग.”
“मी जाऊन येतो.” बाबू म्हणाला.
“खरेच, आपण नवीन वसाहत बनवावी. नवसमाजनिर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवावे. एक प्रयोग सिद्ध झाला की जनतेत आत्मविश्वास येईल. अडचणी येतील, परंतु काही करून दाखवू. येथे मालकापुढे उद्या नाक घाशीत जाण्याची पाळी आली तर त्यापेक्षा खरोखरच तिकडे भूमातेला हसवायला जावे.” पंढरी म्हणाला.
“मी त्या वसाहतीचा नकाशासुद्धा करून ठेवला आहे. मनातील स्वप्ने,--परंतु प्रत्यक्षात येतील तेव्हा खरे.” घना म्हणाला.
शेवटी मित्र गेले. घना एकटाच होता. पुढे कसे होणार याची त्याला चिंता होती. त्याने आपले हस्तलिखित नाटक बक्षिसासाठी पाठवले होते. बक्षीस मिळाले तर किती छान होईल, असे त्याच्या मनात येत होते. सखाराम, मालती,-कोणाचेच पत्र नाही. माझ्यावर का रागावली, का रुसली? माझ्यावर रागावण्या-रुसण्याइतपत त्यांना माझ्याविषयी का आपलेपणा वाटत असेल?
तो अंथरुणावर पडला. तो थकून गेला होता. त्याला झोप लागली. आणि सकाळी उठला तो चांगलेच उजाडले होते.
आज रविवार होता. त्याने विद्यार्थ्यांची सभा सकाळी घेतली होती. आसपासच्या गावी जाऊन त्यांनी मदत गोळा करावी, संप फोडायला बेकारांनी येऊन नये असा प्रचार करावा, हे काम तो त्यांना देणार होता. तो त्यांना शिकवी, त्यांना घेऊन स्वच्छता करी. त्यांचे त्याच्यावर प्रेम होते.
तो घरचे काम आटोपून निघाला. विद्यार्थी धर्मशाळेत जमले होते. त्यांना त्याने सारे सांगितले. मुलांमधूनही तुम्ही मदत गोळा करा. आपले जीवन व्यापक प्रश्नांशी जोडणे म्हणजेच शिक्षण, असे तो म्हणाला. मुलांच्या टोळ्या पाडण्यात आल्या. त्यांच्याबरोबर गाणी पत्रके वगैरे साहित्य देण्यात आले.
घना तातडीने निघून गेला, तो दारात पत्र पडले होते. त्याने ते उत्सुकतेने फोडले. सखाराम व मालती दोघांची पत्रे त्यांत होती. दोघे येणार होती. त्याला आनंद झाला. आधार मिळाला. मालतीचे पत्र लहानसेच परंतु सूचक होते:
“प्रिय घनश्याम,
संधी हातची कशी दवडू? शतजन्मांचा उपाशी मनुष्य वाढून आलेले ताट का दूर लोटील? असे क्षण पुम्हा येत नसतात. हा क्षण माझ्या जीवनात क्रांती करो. क्रांती करणारे तुम्ही.
मालती.
आज जाहीर सभा वगैरे नव्हती. कामाची व्यवस्था लावण्यात येत होती. त्या त्या मोहल्ल्यातून व चाळीचाळींतून संप-समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यांच्यामार्फत सारे काम व्हायचे. ते एक नवीन शिक्षण होते. ज्यांनी उद्या राज्यकारभार हाती घ्यायचा त्यांना शिक्षण मिळायला हवेत. अनुभव हाच खरा शिक्षक. कित्येक वर्षांत मिळणार नाही असे शिक्षण अशा प्रसंगी दोन दिवसांत मिळते. अनुभवाच्या महाशाळेतील महापाठ!