संपाची तयारी 1
“मग येणार ना रोज स्वच्छतासप्ताह पाळायला? आपण रोज सकाळी ६ ते ८ जाऊ. तुमच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही. २६ सप्टेंबरला आपण सुरू करू. २ ऑक्टोबरला समाप्त करू. गांधीसप्ताह स्वच्छतासप्ताहाच्या रूपाने आपण साजरा करू. याल ना सारे?” घनाने विद्यार्थ्यांना विचारले. ते विद्यार्थ्यां त्याच्या वर्गाला येत. तो त्यांना रविवारी दोन तास शिकवीत असे. कधी संस्कृत तर कधी इंग्रजी, कधी गणित तर कधी मराठी; असे विषय तो घेई. घना कोणताही विषय शिकवू शकत असे. विद्यार्थ्यांशी संबंध यावा आणि स्वत:चे ज्ञानही जिवंत राहावे म्हणून तो ते दोन तास देत असे. कधी कधी तो त्यांना इंग्रजी वर्तमानपत्रांतले चांगले लेख वाचून दाखवी. कधी त्यांना राजकारण समजावून देई. त्याचा रविवारचा तास म्हणजे मेजवानी असे.
किती तरी दिवसांपासून असा स्वच्छतासप्ताह पाळावा म्हणून त्याच्या मनात होते. सारा गाव या निमित्ताने झाडून स्वच्छ करायचा. त्यासाठी त्याने स्वच्छतेवरची गाणी केली होती. परंतु ते अजून जमले नव्हते. या वेळेस मात्र हे करायचे असे त्याने ठरवले. मुलांच्या उत्तराची तो वाट बघत होता.
“आम्ही येऊ. तुम्ही बरोबर असल्यावर आम्ही काय म्हणून येणार नाही?” एक मुलगा म्हणाला.
“मीही येईन.” एक मुलगी म्हणाली.
“तुम्ही मुलींनी तर आधी यायला हवे. स्वच्छता निर्माण करणे हा तर तुमचा जन्मसिद्ध हक्क. पुरुषांनी घाण करायची, स्त्रियांनी दूर करायची. नरकासुराला सत्यभामेने मारले. माहीत आहे?”
“आपण रोज कोठे जमायचे?”
“माझ्या खोलीजवळ या. म्हणजे सारे सामान घेऊन आपण जात जाऊ. फिनेलची बाटली, पावडर, डबे, पत्रे, झाडू, फावडी- सारे सामान बरोबर हवे ना?”