गोड निबंध - २ 95
आज आपलें कोणतें गीत राष्ट्रीय गीत म्हणून म्हटलें जातें बरें? कोणतें राष्ट्रीय गीत म्हटल्याबद्दल १९०८ ते १९१० या काळांत तरुणांना तुरुंग पहावे लागत किंवा फटके खावे लागत? कोणतें असें तें राष्ट्रीय गीत कीं, जें बारिसाल येथें १९२२ मध्यें प्रांतिक परिषदेच्या वेळीं म्हणूं दिलें नाहीं म्हणून, देशबंधु तुरुंगात असतांना वाघासारखे चवताळले होते आणि त्यांना अन्नसुध्दां गोड लागलें नाहीं? असे कोणतें गीत कीं जें लाखें लोकांस स्फूर्ति देईल, जें लाखों लोकांच्या मनांत देशभक्ति सजवील? असें कोणतें तें गीत कीं जें यावच्चंद्रदिवाकरौ -- जोपर्यंत भारतवर्ष आहे तोंपर्यंत निनादत राहील? प्रतिभेचें, देवि शारदेंचें, असें कोणतें तें दिव्य अपत्य? काव्यशक्तीनें आपल्या हृदयांतून काढलेलें कोणतें तें रत्न? कवीनें समाधि स्थितींत जाऊन जनतेला दिलेला कोणता तो दिव्यरूप मेवा?
तें गीत म्हणजे ' वंदे मातरम्.' एक काळ असा होता कीं, जेव्हां हें गीत गातांच साहेब लाल होऊन जात. ' वंदे मातरम् ' म्हणतांच म्हणणाराच्या अंगावर फटके उडत. असें हें दिंव्य राष्ट्रीय गीत कोण्या भाग्यवंतानें, कोणा वाग्देवीच्या प्रियपुत्रानें लिहिलें? ज्या बंगालमध्यें प्रथम इंग्रजांनी खंबीर पाय रोंवला त्या वंगभूमींत या अतुलनीय गीताचा जन्म झाला आहे. ज्या प्रदेशांत विशाल गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना, पद्मा अशा तीन तीन मैल रुंद नद्या वाहतात, जेथें जमीन सपाट व सुपीक आहे, जो प्रदेश जगांत अत्यंत सधन म्हणून प्रसिध्द आहे अशा या वंगीय भूमींत या गीताचा जन्म झाला आहे. ज्या बंगालमध्यें अलौकिक बुध्दीचे व अलौकिक भावनांचे पुरुष झाले व होत आहेत त्यांचे हें अत्यंत तेजस्वी अपत्य आहे. भावनाप्रधान विशाल मनाच्या बंगालनें हें गीतरत्न भारतीय जनतेला दिले आहे. ज्या ईश्वरी कृपेच्या पुत्रानें आपल्या प्रसादपूर्ण हृदयांतून हें गीत जनतेला दिलें त्याचें नांव बंकीमचंद्र. काव्यांत जें रवींद्राचें स्थान-तें- वाङ्मयांत बंकीमांचे आहे. कादंबरी क्षेत्रांत त्यांनी फार थोर कामगिरी केली आहे. बंगाली वाङमयांत कादंबरी व काव्य यांतील वाङमय श्रेष्ठ आहे. बंकीमचंद्रांनीं जवळ जवळ १५ कादंब-या लिहिल्या. त्यांच्या कादंब-या फार मोठया नाहींत. १५०-१७५ पानांची म्हणजे त्यांची फार मोठी कादंबरी! परन्तु तेवढया पानांतच बंकीम शृंगार, वीर, करुण इत्यादि रसांचा कल्लोळ उडवून देतात! त्या कादंबरींत एक आनंदमठ ही ऐतिहासिक कादंबरी १७५७-१७६० च्या काळांतील आहे. कलकत्त्याच्या आजूबाजूस त्यावेळेस संन्याशांनी बंड केले होतें. हे संन्याशांचे बंड म्हणून वंगीय इतिहासांत प्रसिध्द आहे, ही कादंबरी अत्यंत उज्ज्वल आहे, उदात्त व ध्येयपूर्ण आहे. तिच्यांत देशभक्ति भरलेली आहे. तींत ग्रंथकारानें जणूं काय आपलें हृदय ओतलें आहे. बंकीमचंद्र हे ज्या ज्या वेळेस उत्कृष्ठ लिहीत त्या त्या वेळेस त्यांच्या मनांवर व शरिरावर परिणाम होत असे. ते म्हणत 'मी जेव्हां माझ्या उत्कृष्ठ कादंब-या लिहिल्या, किंवा त्यांतील उत्कृष्ठ भाग लिहिले, तेव्हां मला रोजच्या चौपट भूक लागत असे.' असे स्वत:चे रक्त त्यांनी या ग्रंथांत ओतलें आहे.