गोड निबंध - २ 46
१६ राष्ट्राची मुंज होऊं दे
ऊपनयन म्हणजे गुरूजवळ नेणें. ज्ञानाजवळ नेणें. वास्तविक मूल जन्माला येतें तेव्हांपासून त्याचें ज्ञानग्रहण सुरू होतें. तरीपण आपण हा एक संस्कार करतों. हा संस्कार झाल्यावर द्विज म्हणतात. द्विज म्हणजे पुन्हां जन्मलेल्या पक्षालाहि द्विज म्हणतात. पक्ष्याला अंडयाची कवची फोडून अनंत आकाशांत उडण्याची प्रबळ इच्छा असते. ती कवची फोडून तो पक्षी ऊडतो. मुंज म्हणजे काय? गुलामगिरीची कवची फोडून ज्ञानसूर्याला मिठी मारायला जाणें. गुलामगिरींत ज्ञान नाहीं. ना विज्ञान ना अध्यात्मिक ज्ञान. आपणांजवळ कोणतेंच ज्ञान नाही. भांडत बसलों आहोंत. हिंदुस्थानांतील सारें एक हें आध्यात्मज्ञान अंगी नाहीं व नेटका प्रपंच करण्याचें शास्त्रीय ज्ञान नाहीं. दोन्ही डोळे फुटले आहेत.
ज्ञान ही कोणास मिरास असतां कामा नये. ज्ञान सर्वांना हवें, ज्याप्रमाणें भाकर सर्वांना हवी. परन्तु आपण सर्वांस ज्ञान दिलें नाहीं, तें सांचवून कोंडून ठेवलें, म्हणून तें मेलें. अंत:पर इच्छा करूं या कीं सर्वांना ज्ञान मिळेल.
पारतंत्र्यांत सर्वांना ज्ञान मिळत नाहीं. ज्ञान आज फार महाग आहे. शाळेत श्रीमंत व गरीब दोघांना सारखीच फी. श्रीमंताला गरीबांइतकीच फी देण्यांत कमीपणा वाटला पाहिजे. पूर्वी आश्रमांतून जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे मदत देई. मोठमोठे आश्रम असत. तेथें राजे लोक, श्रीमंत लोक देणग्या देत. परन्तु पैसे देत म्हणून आपलें मत लादीत नसत. कण्वऋषींच्या आश्रमांत शिरतांना दुष्यन्त म्हणतो,
'आश्रमांत नम्रपणें मी प्रवेश केला पाहिजे.'
विक्रमोर्वशीय नाटकांत राजाचा मुलगा नीट वागत नाहीं म्हणून कुलपति त्याला हांकून देतो. असें स्वातंत्र्य शिक्षण संस्थांत हवें. आज तें कोठें आहे?
शिक्षणसंस्थांतील गुरूजवळ भेदाभेद नकोत; हिंदु-मुसलमान, ब्राह्मण ब्राह्मणेतर भेद नकोत; गुरू व शिष्य भेदातीत हवेत. गुरूंने शिष्याला सर्व प्रश्न समजावून दिले पाहिजेत. त्याला तयार करून जगाच्या समुद्रांत निर्भयपणे लोटले पाहिजे.
मुंज एकाद्या मोठया दिवाणखान्यांत व्हावी तेथें जगांतील सर्व शास्त्रांतील महर्षींच्या तसबिरी असाव्यांत. तेथें त्या बाळाला नेऊन म्हणावे, ' बाळ , या ज्ञानाचा तूं वारसदार. हें घे, यांत भर घाल व या थोराच्या खांद्यावर उभा राहून तूं आणखीं दूरचें पहा.'
आज शेकडा ९० लोक अडाणी आहेत. ज्याला जो गुणधर्म देवानें दिला, त्याचा आज विकास होत नाहीं. याला पारतंत्र्य कारण आहे. राष्ट्राची मुंज व्हावयास हवी असेल तर लोकमान्यांप्रमाणें हें पारतंत्र्य दूर करण्यांस सर्वांनी उठलें पाहिजे.
नम्रतेंशिवाय ज्ञान मिळत नाहीं. हातीं दंड घेऊन ब्रह्मचारी ज्ञानार्थ निघतो. हा दंड दुस-याच्या डोक्यांत घालण्यासाठीं नसून स्वत:च्या कामक्रोधांचे दंडण करण्यासाठीं आहे. हातांतील दंड अंतर्दृष्ट करा. हृदयांतील घाण दूर करा. भारताला मुक्त करणारें, थोर करणारें ज्ञान मिळवा. द्वेषाचे ज्ञान नको आहे ; द्वेष भरपूर आहे. जा बटो, निर्मळ होऊन, तेजस्वी होऊन देशाला सुखी करणारे विचार आपलेसे करून घे व ते कृतींत आण. या बटूला सूर्याचे, अग्नीचे स्वाधीन करायचें असें मंत्रांत म्हटलें आहे. अग्नि व सूर्य यांचेजवळ मालिन्य नाहीं, प्रखर तेज आहे. भूमीवरील अग्नि व सूर्य कोणते? ''तं धीरास: कवय: उन्नयंति.'' त्या बटूला धीरवान् थोर माणसें उन्नतीप्रत नेतील. अधीर व उल्लू अशा गुरूजवळ कोठला विकास? हाणा, मारा, ठोका सांगणा-या गुरूजवळ कोठलें खरें माणुसकीचें संसाराला सुंदर करणारें ज्ञान?
--वर्ष २, अंक ४६.