गोड निबंध - २ 32
प्राचीन काळांत राजांचे धन गोधनावरून समजून येई . विराटांजवळ साठ हजार गायी होत्या. दुयोर्धनाच्या हजारों गायी ठिकठिकाणी ठेवलेल्या होत्या. वसिष्ठाजवळची उत्कृष्ठ कामधेनु घेण्यासाठीं विश्वामित्र त्याला कोटयवधि गायी देण्यास तयार होतो, यावरून त्याच्याजवळ किती गायी असतील याची कल्पना करावी. मोठमोठया आचार्यांजवळ गायी असत, व शिष्यांना गोरक्षणाचें काम करावें लागे. वसिष्ठानें दिलीप राजाला पुत्रप्राप्तीसाठी नंदिनी या कामधेनूच्या मुलीची सेवा करण्यास सांगितलें. नंदिनीचे संरक्षण करण्यासाठीं तिच्यावर झडप घालूं पाहणा-या सिंहरूपी नंदिनीस तो स्वत:चे प्राण देण्यास तयार होतो. दिलीपानें अशी गोसेवा केली व तो धन्य झाला. धौम्य ऋषीनें आपल्या उपमन्यु वगैरे शिष्यांस अशीच गोसेवा करावयास सांगावें.
गायीची थोरवी श्रीकृष्ण--चरित्रामुळें वाढली. श्रीकृष्ण हा वृंदावनांत वाढलेला ' परमेश्वर.' गोकुळामध्यें आपल्या हजारों गायींची खिल्लारें घेऊन कृष्ण-बळरामांनी धीरसमीरे यमुनातीरें जावें. काळी कांबळी, व सुंदर काठी घेऊन, गळयांत वनमाळा घालून ओठांनी पांवा वाजवून कृष्ण भगवानांनीं यमुनातटीं गायी चाराव्या. याच कृष्णाची 'बहुळा' ही आवडती गाय होती. या बहुळेचें गाणें जुन्या बायकांना येतें तें फार गोड आहे. कृष्णांस जेव्हां देवत्व प्राप्त झालें, त्याची पूजा सर्वत्र होऊ लागली, तेव्हां गोमातेसहि साहजिकच महत्त्व चढलें. गोपालकृष्ण गायी चारीत व मुरली वाजवींत वृक्षातळीं उभे आहेत हें चित्र लाखों लोकांच्या हृदयास भक्तिप्रमाचें भरतें आणतें हा आपला नित्याचा अनुभव आहे.
आर्यावर्तात गोपूजा सुरू झाली. हिंदुमात्र गायीस देवतेप्रमाणें मानूं लागला. प्रत्येक कुटुंबात गाय ही असावयाचीच. मोठमोठे दुष्काळ पडावे तरी गायित्रीला विकूं नये अशीं शेकडों उदाहरणें लोकांस माहीत आहेत. गाय म्हणजे कुटुंबातील माणसांचा जीव कीं प्राण, गाय दिसावयास किती सुंदर, दिलदार व अत्यंत निर्मळ असते. म्हसराप्रमाणें चिखलांत लोळणें, डबक्यांत डुंबणे तिला आवडत नाहीं.
तिची मानेजवळची पोळी किती छान दिसते. तेथें तिला हळुहळू खाजवावें. म्हणजे ती मान वर वर नेते व आणखी कुरवाळा असें सांगते. तिच्या अंगावरची लव किती मृदु व तजेलदार! तिचीं पाडसें किती खेळकर व तल्लख! कशीं उडया मारतात, पाठीवर शेंपटी घेऊन नाचतात. मोठीं अचपळ असतात तीं. असें तें खोडकर वासरूं गायीस ढुश्या देतें व गायीस जास्त प्रेमाचा पान्हा फुटतो व ती त्याचे अंग चोळत राहाते. असें हें दृश्य फारच मनोहर असतें.
अशी गाय कुटुंबाची संपत्ति आहे. तिला विकलें तर अजूनहि पाप मानतात. गोदानासारखें पुण्य नाहीं. आपणांत निरनिराळया वेळीं गोप्रदानें देण्याची पध्दत होती. हल्ली चार आणे दिले म्हणजे गोप्रदान होतें. परंतु पूर्वी खरोखरच्या गाई दिल्या जात. अजूनहि मनुष्य मरावयाचे आधीं गोप्रदान करतो. अशा रीतीनें गाय हें सर्वांत श्रेष्ठ दान, सर्वश्रेष्ठ धन आपणांकडे मानलें गेलें होतें.