गोड निबंध - २ 50
१९ एक सुंदर कविता
[इक्बाल हा पंजाबमध्ये कवि होऊन गेला. मागील वर्षी तो मरण पावला. त्याच्या एका सुंदर कवितेचा गद्य अनुवाद इंग्रजीवरून देत आहें.]
उंट सेवा करतो, हालअपेष्टा भोगतो. सहनशीलता आणि सतत परिश्रम हा त्याचा धर्म आहे. वाळूंतून मुकाटयानें तो मार्ग काढीत जात असतो. वाळवंटातून प्रवास करणा-यांची ती नौका आहे. प्रत्येक काटेरी झुडपांना त्याची पावलें माहीत आहेत. तो फार थोडें खातो, फार थोडी झोंप घेतो. श्रमाची त्याला संवयच झाली आहे. तो पाठीवर कितीतरी सामान सुखानें घेतो. बसणारा, त्याचें ओझें सारें कांही पाठीवर घेतो. मुक्काम येईपर्यंत न थांबता तो सारखा जातच असतो. वरचा बसणारा कंटाळतो परन्तु उंट कंटाळत नाहीं.
त्या उंटाप्रमाणें कर्तव्याचा भार शिरावर घे; कुरकुर करूं नकों. अशानेंच देवाजवळ जाशील. हे निष्काळजी मनुष्या, नीट लक्ष दे. आज्ञापालन शीक. स्वातंत्र्य बंधनांतून जन्मतें. संयमातून मोक्ष मिळतो. आशाभंगाने माणसांतील तेजस्विता धुळींत जाते. धर्माची आज्ञा मान. आज्ञापालनानें नालायक लायक होत जातो. सूर्यचंद्रावर ज्याला स्वामित्व मिळवायचें आहें त्यानें स्वत: धृत-वत् झालें पाहिजे. वारा स्वत:ला फुलाच्या सुगंधानें बांधून घेतो. कस्तुरी मृगाच्या नाभींत स्वत:ला कोंडून घेते, आकाशांतील तारे नम्रपणें बांधल्यासारखें वागत असतात. उत्पत्तीच्या नियमानुसार गवत वाढतें. गुलाबाचें लाल फूल स्वत:चा नियम मानतें आणि म्हणून सारें रक्त त्याच्या नसानसांतून नाचते. पाण्याचे बिंदू ऐक्याच्या नियमांने एकत्र येतात व सागर होतो. वाळूचे कण ऐक्याच्या नियमानें एकत्र येतात व सहारा वाळवंट होतें. नियमपालन हें सामर्थ्याचे साधन. या साधनाची तूं कां उपेक्षा करतोस? धार्मिक बंधने न पाळून अनिर्बंन्ध होणा-या पुन्हां धार्मिक बंधने पाळ. ते नियम कठीण आहेत म्हणून कुरकुर नको करूं. पैगंबराचे आज्ञेंचे उल्लंघन नको करूं.
तू वासनांचा गुलाम नको होऊंस. वासनांना लगाम घाल. आपले मन आपल्या ताब्यांत घे. तूं माती असलास, तरी संयमाग्नींत स्वत:ला घालशील तर मोती होशील. जो स्वत:च्या वासनांवर सत्ता चालवूं शकत नाहीं, त्याच्यावर सारी दुनिया सत्ता चालवील. जो स्वत:चा गुलाम, तो जगाचाहि गुलाम होतो. भीति व आसक्ति जन्मत:च तुझ्यांत शिरली आहेत. तुला मरणाची भीति वाटते पण 'एक ईश्वर सत्य आहे, बाकीं कांही नाहीं ' या मंत्राचा दंड हातात घे म्हणजे सारी भीति नाहींशी होईल. प्रभु जणुं तुझाप्राण होऊं दे. ज्याच्या जीवनांत देव रहावयास आला, त्याची मान मोहमायेसमोर वांकत नाही. एका ईश्वराशिवाय तो कोणाला भीत नाही. अब्राहामप्रमाणें प्रभूच्यासाठीं स्वत:चा प्रिय मुलगा मारावयास तो तयार होतो. ज्याच्या हृदयांत प्रभु आहे, तो जरी एकटा असला तरी लाखो शत्रूंना तो भारी आहे. तो एक नसून अनंत होतो. तो जीवन क:पदार्थ मानतो व कर्तव्यासाठी तें फेंकून देतो.