गोड निबंध - २ 74
२८ सडलेला समाज
हिंदुसमाज उच्चनीचपणाच्या कल्पनांनी सडून गेला आहे. हें उच्च-नीचपणाचें पाणी झिरपत झिरपत खालपर्यंत गेलें आहें. सा-या समाजांत सर्वत्र शिंवू नको धर्म झाला आहे. परंतु शिवूं नको धर्माच्या आड आज केवळ आडदांडपणा उरला आहे. आपल्या हुकमतीखालीं अस्पृश्यांनी राहावें असें स्पृश्यांना वाटतें. अस्पृश्यांनी स्वाभिमानानें जगतां कामा नये, नीट-नेटकें राहता कामा नये; पाटलांचे हुकूम ऐकले पाहिजेत. गांवांतील कोणी स्पृश्य सांगेल ते काम केलें पाहिजे. अशी अनंत गुलामगिरी आहे. अंमळनेर तालुक्यांतील अनेक गांवांच्या करुण कहाण्या कानीं येऊन स्पृश्य समाजाची झोटिंगशाही पाहून लाज वाटते. मुडी गांवी दिपा महाराचा छळ स्पृश्यांनी चालवला आहे. सारबेंटैं येथील पो.पाटलाच्या चुलत्यानें महार कामगाराला उशीर झाला म्हणून पायांतील जोडयानें बेदम मारलें. कामगारानें फिर्याद केली आहे. एक अस्पृश्य फिर्याद करतो यानें चिडून तेथील पो. पाटलानें दडपशाहीं सुरू केली आहे असें कळतें. टाकरखेड्यांस घरें बांधण्यांसाठीं हरिजनांना प्लॉट्स मिळावे म्हणून केलेल्या अर्जास सरकारची मंजुरी आली. परंतु त्या नंबरावर मराठयांची खळीं असतात म्हणून त्यांचा हरिजनांवर म्हणे बहिष्कार. शिरुडला मेलेल्या ढोरांचे कातडें स्पृश्य हक्काने परत मागतात. तें न ऐकल्यामुळें आज ३॥ वर्षे बहिष्कार; सर्व बलुतीं बंद. मुडीच्या एका सुखी हरिजनाच्या शेतांत गुरें घालून मागील वर्षी नुकसान करण्यांत आले. त्यानें तक्रार केली तर त्याला मारहाण. केस चालली. त्यांत मराठ्यांना दंड झाले. म्हणून अधिकच छळ. हिंगणें खु॥ येथील पो. पाटलाच्या घोडयाची व्यवस्था परगांवाहून येऊन महारांना ठेवावी लागते, नाहीं तर त्रास. कु-हे येथील मुलकी पाटलानें गांवकामगारास त्यानें पाय दुखत होता म्हणून एक दिवस बिनमोबदला म्हैस चारण्याचें नाकारलें म्हणून घरांत शिरून मारले म्हणतात. व तक्रार कोठें करशील तर मरशील अशी धमकीहि म्हणे दिली. आडींचे एका महार भगिनीचें शेत पाटलानें जबरीनें पेरलें. तिनें मामलेदाराकडे तक्रार केली. मामलेदारानें पाटलास निर्दोष सोडून शेत पिकांसह परत देवविलें. परन्तु या पाटलानें म्हणें माणसें लावून शेतांतील बाजरी खुडून नेली! ती महारीण काय करील बिचारी? मेहेरगांवला महारांनी ''तुमचें घाण पाणी आमचे घराजवळून जातें '' असें नम्रपणें सांगितलें, तर त्या महारांना मारहाण झाली. त्या महार बंधूची बायको 'मारूं नका ' म्हणाली तर तिलाहि मार. कराई गांवीं तर हरिजनांवर पक्की गुलामगिरी लादली आहे. हरिजनांनी चांगले कपडे नाहीं घालता कामा, दागिनें नाहीं घालता कामा, शेती नाहीं करता कामा, घरें नाहीं बांधता कामा! कोणी स्वाभिमान दाखविला तर जाच होतो. हिंगणें येथें रजपूत लोक आहेत. खजगी कामें महारांकडून मोफत करवून घेतात. एकानें नाकारलें तर त्याचा छळ. जुन्नें खेडीं, पातोंडे येथे हरिजनांस पाणीं नाहीं. डबकें आटलें म्हणजे स्पृश्यांजवळून पाणी विकत घ्यावें लागतें!
वरील हकिगती मजकडे लिहून आल्या आहेत. त्यांचेवर मी आरोप नाहीं करीत. त्या शंभर टक्के ख-या कदाचित् नसतीलहि. परंतु त्यांत कांही तरी तथ्य असलेंच पाहिजे. जुलूम होत असलाच पाहिजे. अशा गोष्टींना पुरावेहि नसतात. गांवातील हरिजनहि पुरावा देण्यास भितात. कारण स्पृश्यांवर ते अवलंबून असतात बिचारे.